१५ मार्च २०२५ संगमनेर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलेले छात्रभारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले, राम आरगडे, मोहम्मद तांबोळी, राहुल जराड यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. नगरपालिकेच्या प्रांगणात गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नगरपालिकेच्या सभागृहात आढावा बैठक आटोपून बाहेर आले असता छात्र भारती संघटनेचे अनिकेत घुले व कार्यकर्त्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याने जातीय तेढ निर्माण होत असून त्यांना मंत्रिमंडळातून काढावे, या मागणीचे निवेदन मंत्री विखे यांना देण्यासाठी आले होते.

त्यावेळी छात्रभारतीचे कार्यकर्ते घोषणा देत असताना महायुतीचे कार्यकर्ते तेथे जमा झाले. त्यांनी अनिकेत घुले व इतर तिघांना मारहाण करत बाहेर काढले. दरम्यान, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल झाला नव्हता.
मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार अमोल खताळ यांच्या समोर हा प्रकार घडला. शहरात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी या संदर्भात अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगितले. दरम्यान, शहर पोलिस ठाण्यात आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता त्यांनी तक्रार घेतली नाही, असे अनिकेत घुले यांनी सांगितले.
मारहाण करूनही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उलट आरोप
आंदोलन करणे हा आपलाच स्वयंभू अधिकार आहे आणि त्याचा वापर करून सवंग प्रसिद्धीच्या झोतात राहाता येते. असे समजणारी एक जमात संगमनेर शहरात कार्यरत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यात घुसून धुडगुस घालणाऱ्या प्रवृत्तींचा आम्ही निषेध केला, असा उलट आरोप संगमनेर शहरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला.
पोलिसांनी तक्रार घेतली नाही : अनिकेत घुले
आम्ही न्याय मार्गाने निवेदन देण्यासाठी गेलो होतो. आम्हा चार जणांना मारहाण झाली. त्यापैकी दोघांना जास्त मार लागला आहे. शहर पोलिस ठाण्यात आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता त्यांनी तक्रार घेतली नाही.पोलिसांवर दबाव असून त्यामुळे आम्ही पोलिस अधीक्षकांना ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे, असे छात्रभारतीचे अनिकेत घुले यांनी सांगितले.
अद्याप तक्रार दाखल नाही, तपासनंतर निर्णय घेऊ
यासंदर्भात अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. आम्ही या घटनेचे संपूर्ण तपास करून पुढील निर्णय घेऊ, असे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले.