व्हे-पावडरमध्ये ‘या’ घातक पदार्थाची भेसळ; अन्न सुरक्षा विभागाने केला गुन्हा दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :- व्हे-पावडरमध्ये मेलामाईन या घातक पदार्थाची भेसळ होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी येथील गणेश एजन्सी रिपॅक व विक्री करीत असलेल्या व्हे-पावडरमध्ये ही भेसळ असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी गणेश एजन्सीचा मालक रूपेश राजगोपाल झंवर याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पी. बी. कुटे यांनी फिर्याद दिली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाचे सहआयुक्त त्यांच्या पथकाने जुलै 2021 मध्ये झंवर याच्या गणेश एजन्सीवर छापा टाकला होता.

तिथे झंवर याने रिपॅक व विक्री करीत असलेल्या व्हे-पावडरचे (मिल्की ओसियन बॅण्ड) नमुने अन्न सुरक्षा अधिकारी रा. ना. बढे यांनी तपासणीसाठी घेत उर्वरित साठा जप्त केला होता.

या नमुन्यामध्ये मेलामाईन या घातक पदार्थाची भेसळ म्हैसूर येथील केंद्रीय रेफरल अन्न प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत आढळली. त्यामुळे व्हे-पावडर खाण्यास असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

अशा प्रकारच्या व्हे-पावडरव्दारे दुधामध्ये प्रोटीन व एसएनएफ प्रमाण कृत्रिमपणे वाढविण्यासाठी भेसळ केली जाते व एकप्रकारे जनतेच्या जिवीताशी चालू असलेला

हा खेळ असल्यामुळे झंवर याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशाप्रकारे मेलामाईनसारख्या घातक पदार्थाची निव्वळ दुध भेसळीच्या उद्देशाने वापर होणे ही अतिशय गंभीर बाब आहे.

या प्रकरणी असे मेलामाईन कोठून येते व अशा व्हे-पावडरची कोण खरेदीदार आहेत. याबाबत तपास होणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय दुध भेसळीस आळा बसणार नसल्याचे सहायक आयुक्त संपत शिंदे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe