अ‍ॅड कोल्हे यांची आ. लंके यांनी घेतली भेट पोलिसांनी गुुंडगिरीला चाप लावण्याची मागणी

न्यायालयाच्या आवारात करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अ‍ॅड. अशोक कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. नीलेश लंके यांनी नगर येथील रूग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली. लंके यांनी अ‍ॅड. कोल्हे यांना धीर देत आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.

अ‍ॅड. कोल्हे यांच्याकडून घटनेचा तपशील जाणून घेतल्यानंतर वकीलांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कायद्याची सेवा आणि रक्षण करणारांवर अशा पध्दतीने होणारे हल्ले चिंताजनक असून त्याचा आपण निषेध करीत असल्याचे लंके म्हणाले. अ‍ॅड. अशोक कोल्हे यांची प्रकृती हळूहळू सुधारत असून ते लवकरच आपल्या कामावर रूजू होतील असा विश्‍वास व्यक्त करतानाच त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी त्यांनी ईश्‍वराकडे प्रार्थना केली.

पत्रकारांशी बोलताना आ. लंके म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य जनतेवर ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार होतो त्यांना न्याय देण्याचे काम करणाऱ्या वकीलावरच नगर शहरात हल्ला झाला होतो हे कायदा व सुव्यवस्थेची काय स्थिती आहे हे निर्देशित करत आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी राजाराम आढाव व त्यांची पत्नी या वकील दाम्पत्याची निर्घुण हत्या झाली.

नगर शहरातील पोलीस प्रशासनास माझी विनंती आहे की त्यांनी शहरातील गुंडगिरी, दहशतीच्या विरोधात ठोस पाऊल उचलली पाहिजेत. कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी आज पोलीस प्रशासन आमच्यासारख्या राजकीय व्यक्तींवर लक्ष ठेउन,आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यापेक्षा अशी गुंंडगिरी करणारांना पायबंद घालण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आ. लंके यांनी केले.

न्यायालयाच्या आवारात करण्यात आलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या अ‍ॅड. अशोक कोल्हे यांची आ. नीलेश लंके यांनी रूग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.