… अखेर ‘त्या’ गावात महिलांनी बाटली आडवी केलीच..! विशेष ग्रामसभेत असंख्य महिलांनी केला दारूबंदीचा ठराव मंजूर

Published on -

Ahmednagar News : काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे गावठी दारूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून महिलांनी उक्कलगावातील ४ दारू अड्डे उद्ध्वस्त केले.

एका दारू अड्ड्यातील सामान बाहेर काढून त्याची हाेळी केली. गावातील सर्व दारू अड्डे बंद करून ते चालवणाऱ्यांवर कारवाई करेपर्यंत मृताचा अंत्यविधी न करण्याचा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला होता .

त्यावेळी सरपंच, उपसरपंचांनी विशेष ग्रामसभा घेऊन अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव करण्याचे आश्वासन महिलांना दिले होते. त्यानुसार काल विशेष झालेल्या ग्रामसभेत असंख्य महिलांनी दारूबंदीचा सर्वानुमते ठराव संमत करून ग्रामसभेने त्यास मंजुरी दिली. महिलांनी संघटित होत उभारलेल्या लढ्याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

याप्रसंगी विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रविना शिदे होत्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी राजाराम कांदळकर यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचन केले.

यावेळी उपसरपंच नितीन थोरात, उर्मिला थोरात, सीमा तांबे, शरद थोरात, पुरुषोत्तम थोरात, बबन रजपूत, अर्चना रजपूत, अनिल थोरात, विजय तोरणे आदीसह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळेच्या आवाराबाहेरील दुकानात दारूच्या बाटल्या विकल्या जात असल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या. त्यानंतर सभेत हातभट्टी दारू विक्रीविरोधात महिला आक्रमक झाल्या. गेल्याच आठवड्यात महिलांनी दारूची दुकाने पेटवली होती.

दरम्यान, गावात कायमस्वरूपी दारूबंदी करा, अशी मागणी महिलांनी केली. ग्रामसभेत अवैध दारू विक्री करणाऱ्यांना बोलवा त्यानंतर सोक्षमोक्ष होईल, अशी मागणी महिलांनी केली.

विशेष म्हणजे काही गरीब महिलांना गावातील काही लोक धमक्या देत असल्याची माहिती महिलांनी प्रत्यक्षरित्या सभेत बोलून दाखविली. तसेच चौकात दारू अड्डे टाकून खुलेआम दारू विकू असे काहीजण म्हणत असल्याचे महिलांनी सांगीतले.

यामुळे महिला आणखी आक्रमक झाल्या. यावेळी सभेत इतर काही महत्त्वाचे विषय सभेत मंजुरी ठेवण्यात आले. तसेच सभेमध्ये गावातील दारूबंदीसाठी सूचक म्हणून सुमन रावसाहेब धनवटे यांनी दिले तर त्यास अनुमोदन उपसरपंच नितीन आबासाहेब थोरात यांनी दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe