Ahmednagar News : गरीबी पाचवीलाच पुजलेली, काम करेल तेव्हा चूल पेटायची, अशा परिस्थितीत घरात शिक्षणाचा कसलाही गंध नसताना हलाखीच्या परिस्थितीत वाट काढत परिस्थितीचा बाऊ न करता आलेल्या संकटांना सामोरे जात परिस्थितीला जिद्द बनवत एकाच कुटुंबातील तीन बहिणी आणि एक भाऊ पोलीस दलात भरती झाल्याने गावामध्ये व पंचक्रोशीमध्ये या कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
सोनाली अंकुश मोटे पुणे ग्रामीण पोलीस, रुपाली अंकुश मोटे अहमदनगर पोलीस, रोहिणी अंकुश मोटे मुंबई शहर पोलिस, ज्ञानेश्वर अंकुश मोटे पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्याने आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले आहे. कर्जत तालुक्यातील सुपा रहिवासी असलेल्या अंकुशराव मोटे यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची.

घरी थोडीफार शेती असताना दुष्काळी परिस्थितीमुळे पुर्णपणे बेभरवशाची असायची अशा परिस्थिती मध्ये मिळेल ते काम करून मोल मजुरी करून प्रपंच चालवला. एक अशिक्षित घर म्हणून मोटे कुटुंबाकडे पाहिले जायचे.
तीन मुली आणि एक मुलगा असे चौघेजण लहान पणापासून अभ्यासात हुशार असल्याने अंकुशराव मोटे आणि त्यांच्या पत्नी कमलबाई मोटे यांनी मुलांच्या शिक्षणासाठी मोलमजुरी करून परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षित केले. मुलांनीदेखील आई- वडिलांच्या कष्टाचे चीज करत चौघेही पोलीस दलात भरती झाले.
यातील सोनाली मोटे या २०१२ साली पोलिस दलात भरती होऊन पुणे ग्रामीण पोलीस दलात काम करत आहेत. रुपाली मोटे आणि रोहिणी मोटे या २०१७ साली एकाच वेळी पोलिस दलात भरती होऊन रुपाली मोटे या अहमदनगर पोलीस दलात तर रोहिणी मोटे या मुंबई शहर पोलिस दलात काम करत असतानाच नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीमध्ये त्यांचा सर्वात लहान भाऊ ज्ञानेश्वर मोटे हा पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाला.