तब्बल ४२ वर्षांनंतर ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार त्यांच्या जमिनीचा मोबदला …!

Pragati
Published:

Ahmednagar News : कुकडी कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला २५-३० वर्षे मिळत नसेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे. हक्काच्या मोबदल्यासाठी मागणी करूनही शेतकऱ्यांची एक पिढी यामध्ये गेली तरी सरकारला जाग नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकांचे म्हणणे ऐकले जात होते. म्हणूनच माझ्या पाठपुराव्याने १०९ कोटी रुपये मोबदला मिळवून देता आला. पण हे सरकार ढिम्म असून केवळ निधी नसल्याचाच पाढा ऐकवत आहेत.

पण शेतकऱ्यांनी जो लढा दिला त्याला यश आले असून, पुढील १५ दिवसांत कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा भूसंपादनाचा हक्काचा मोबदला मिळणार आहे. तसे आश्वासन कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षकांनी दिले आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या जमिनीची हक्काची रक्कम जमा होणार आहे.अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी १९८२ साली कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण, कोपर्डी, कुळधरण आणि शिंदे या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीचे वाढीव दावे मंजूर होऊनही त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला नव्हता.

भूसंपादन अधिकारी, कुकडी बांधकाम विभाग यांना शेतकऱ्यांनी वारंवार निवेदने दिली, पाठपुरावा केला, आंदोलने केली मात्र सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती.

श्रीगोंदा न्यायालयानेही २०१२ साली याबाबत निर्णय देऊन शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. मात्र, जलसंपदा विभाग कोणताही निर्णय घेत नसल्याने कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३ जुलैपासून कुकडी सिंचन मंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.

दरम्यान पुढील १५ दिवसांत कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा भूसंपादनाचा हक्काचा मोबदला मिळणार आहे. तसे आश्वासन कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षकांनी दिल्याने शेतकरी संघटनेच्यावतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe