Bhandardara Dam : भंडारदरा धरणाच्या पाठोपाठ निळवंडे धरणही ५० टक्के भरले

Ahilyanagarlive24 office
Published:

Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाठोपाठ निळवंडे धरणही ५० टक्के भरले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पाऊस मंदावला असल्याने धरणाच्या सांडव्यातुन पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांच्या पुढे गेला असून धरणामध्ये ४३८५ दलघफु पाणी जमा झाले आहे.

निळवंडे धरण सध्या ५२ टक्के भरले आहे. गत आठ ते दहा दिवसांपासून भंडारदरा धरण तसेच पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र काल बुधवारी परिसरासह पाणलोटातही पावसाचे प्रमाण कमी झालेले दिसुन आले.

पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने भंडारदरा धरणातून सुरु करण्यात आलेला विसर्गही कमी करण्यात आला आहे. काल बुधवारी सकाळी सहा वाजता प्रवरा नदीपात्रात भंडारदरा धरणातून ७२०९ क्युसेसने पाणी सोडण्यात येत होते.

त्यानंतर सकाळी आठ वाजता तोच विसर्ग ६०८७ क्युसेस करण्यात आला. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दुपारी तीन वाजता हा विसर्ग २०५३ क्युसेसवर आला होता. भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या भात आवणीवरही परिणाम दिसुन आला.

मंगळवारी मात्र भंडारदरा धरणासह परीसरातही पावसाने धुमाकुळ घातला होता. त्यामुळे भंडारधरा धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने विसर्ग नदीपात्रात वाढविण्यात आला होता. मागील 24 भंडारदरा येथे ६३ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे १२३ मिली मीटर पाऊस पडला आहे.

रतनवाडी १२७ मिली मीटर, पांजरे १०६ मिली मीटर व वाकी येथे ४९ मिली मीटर पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९२४७ दलघफु झाला असून भंडारदरा धरण ८३ टक्के भरलेले आहे. वाकी लघुबंधारा पुर्ण क्षमतेने भरलेले असून ७८९ क्युसेसने पाणी नदीपात्रात वाहत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe