अहिल्यानगर : राहुरी, नेवासा, अहिल्यानगर सीमेवर असलेल्या इमामपूर घाट परिसरात लागलेला वणवा विझविण्यात वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आहे. वणव्यामध्ये वनसंपदेचे मोठे नुकसान झाले असून वन्य प्राण्यांचे हाल झाले. शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे.
राहुरी तालुक्यातील धुमा डोंगर, अहिल्यानगर तालुक्यातील कवडा डोंगर व नेवासा तालुक्यातील इमामपूर घाटातील मोठे क्षेत्र जळून खाक झाले तर कुरण डोंगर वाचविण्यात यश आले आहे.. गुरुवार दि. २७ रोजी दुपारी इमामपूर घाट परिसरात डोंगराला वणवा लागला होता.

वाळलेले गवत, पालापाचोळा व जोराचा वारा यामुळे रौद्ररूप धारण करत अहिल्यानगर, नेवासा, राहुरी तालुक्यातील आर्मीचे व वनक्षेत्र आगीच्या भक्षस्थानी सापडले. त्यामध्ये विविध औषधी वनस्पती व मोठाल्या वृक्षांना देखील वणव्याचा फटका बसला आहे.
वन्यप्राणी जीवाच्या आकांताने सैरावैरा धावत होते. गुरुवार दुपारपासून वणवा विझवण्यासाठी वनअधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत होते. दुपारी कडक ऊन व जोराचा वारा असल्याने वणवा विझवण्यासाठी अडचण येत होती. रात्री स्थानिक तरुण व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फॉगिंग मशीनच्या आधारे वणवा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
अहिल्यानगर व नेवासा तालुक्यातील क्षेत्रावरील वणवा रात्री एक वाजण्याच्या सुमारास विझविण्यात आला. परंतु राहुरी तालुक्यातील धुमा डोंगर सर्वच बाजूने पेटल्याने तसेच खोलदरी व कपार असल्याने येथील वणवा विझवण्यासाठी मोठी अडचण तयार झाली होती. शुक्रवारी (दि. २८) सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास सर्व वणवा आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान गुरुवारी रात्रीच पिंपळगाव उज्जैनी व आगडगाव परिसरातील डोंगरांना देखील वणवा लागून येथे देखील मोठे वनक्षेत्र जळाल्याची माहिती मिळत आहे. वणवा लागल्यानंतर वनसंपदा, विविध दुर्मिळ औषधी वनस्पती, जनावरांचा चारा, मोठ मोठाली वृक्ष तसेच वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी यांचे मोठे नुकसान झाले.