अकोल्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सात दिवसांपासून सुरू केलेले उपोषण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
मंत्री विखे पाटील यांनी गणोरे येथे येऊन उपोषणकर्ते संदीप दराडे आणि शुभम आंबरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांना दिली.

याप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड, शिवाजीराव धुमाळ, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून त्यांच्या मागण्याबाबत सरकारला निश्चितच सहानुभूती आहे. आता अनुदानासाठी घातलेल्या सर्व अटी काढून टाकण्यात आल्या असून, राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान वर्ग करण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचे विखे पाटील म्हणाले.
दूध दराच्या बाबतीत सर्व खासगी आणि सहकारी संघ चालकांसमवेत झालेल्या बैठकांची माहीती देऊन उसाप्रमाणे दुधालाही आधारभूत किंमत मिळावी, यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
आधारभूत किंमतीबाबत त्यांनी सकारत्मकता दर्शवली असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले, की राज्य मंत्रीमडळाच्या बैठकीत सर्वांनी ३० रूपये दर आणि पाच रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय होऊ शकला. आता अंमलबजावणी करून घेणे हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात खाद्य उत्पादकांसमवेत बैठक घेताना शेतकरी प्रतिनिधींना बोलावण्याची मागणी विखे पाटील यांनी मान्य केली. येत्या आठवड्यातच ही बैठक घेण्याचे मान्य केले. राज्य सरकारने आतापर्यंत अनुदानापोटी २३१ कोटी रुपये वाटप करण्याचा निर्णय केला.
यापैकी ६० कोटी रुपयांचे राहिलेले अनुदानाचे वितरण १५ जुलैपर्यंत होणार असून अहिल्यानगरमधील ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८२ कोटी रुपयांचे अनुदान वर्ग झाले असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.