Akole News : अकोले तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना रोडची अतिशय दुरावस्था झाली असून धुळीने आणि रस्त्यावरील खड्ड्यामुळे वा रोड़ राहणारे रहिवासी, नागरिक त्रस्त झाले आहेत.
रस्ता दुरुस्तीच्या मागणासाठी युवक आक्रमक झाले असून सर्वपक्षीय नेत्यांच्या संदर्भात उपहासात्मक वाक्याचे फ्लेक्स बोर्ड लावून पंचनामा करण्यात आला आहे.
अगस्ती सहकारी साखर कारखाना रोडच्या धुळीमुळे अनेक नागरिक खोकल्याचा, सर्दीचा, डोळ्याचा, घशाचा, मनक्याचा आजाराने त्रस्त आहे. हा रस्ता व्हावा म्हणून मागील वर्षी या रोडवर राहणाऱ्या युवकांनी रस्ता रोको आंदोलन केले होते.
अनेक वेळा कारखाना, नगरपंचायत, लोकप्रतिनिधी यांना निवेदन दिलेले आहे. मागील वर्षी अगस्ती कारखान्याचे विद्यमान चेअरमन सिताराम गायकर यांनी चालू वर्षीचा गळीत हंगामापूर्वी रस्त्याचे काम करू असे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र त्यावरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या रस्त्याच्या कामासाठी आमदार व खासदार हे 5 कोटींचा निधी दिल्याचे म्हणतात. मात्र कोणी निधी आणला, त्यात किती रस्ता होणार आहे. त्याचे इस्टीमेट झाले की नाही, याबाबत सर्व गोष्टी गुलदस्त्यात आहे.
आणि निधी मंजूर असेलच तर त्यात सर्व कारखाना रोडचे काम होणार नाही मग अपूर्ण राहणाऱ्या रस्त्याचे कामाचे काय असा प्रश्न हे नागरिक उपस्थित करीत आहे. काल बुधवारी सर्व कारखाना रोडवर सर्वपक्षीय नेत्यांचे फोटो टाकून त्यांच्या बद्दल उपहासात्मक वाक्य टाकून फ्लेक्स बोर्ड लावलेले आहेत.
हे फ्लेक्स बोर्ड नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. या संदर्भात कारखाना रोडच्या युवकांची बैठक झाली असून याबाबत अतिशय गंभीयांने चर्चा झाली असून मोठे आंदोलन उभे करण्याचे ठरल्याचे समजते.
तसेच रस्ता रोको आंदोलन करून कारखाना गळीत हंगामात मोठा अडथळा निर्माण करण्याचे ठरले आहे. काल बुधवारी कारखान्याच्या डिझेल पंपावर बाहेर जाणाऱ्या वाहनामध्ये डिझेल भरू न देता तशीच वाहने काढून दिली. तसेच कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.