१८ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी युनायटेड किंगडमहून आलेल्या भाविकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ५०० रुपये किंमतीचे पूजेचे ताट तब्बल चार हजार रुपयांला विकल्याने भाविकांची मोठी फसवणूक झाली.या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी दुकान मालकासह एजंटांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यातील दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी दिली.युनायटेड किंगडम येथून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या ७३ वर्षीय बलदेव राम आणि त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक झाली.

मूळ जालंधर,पंजाब येथील असलेले बलदेव राम व्यवसायानिमित्त युनायटेड किंगडममध्ये स्थायिक आहेत.सोमवारी साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना कमिशन एजंटाने त्यांना जबरदस्तीने हार-फुलांच्या दुकानात नेले.तिथे ५००च्या पूजेच्या ताटासाठी तब्बल चार हजार रुपये घेण्यास भाग पाडले.
भाविकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर माळी यांनी भाविकांसह शिर्डी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.भाविकांच्या तक्रारीनुसार शिर्डी पोलिसांनी आरोपी योगेश मेहेत्रे (रा. सावळी वीहीर, ता. राहाता), अरुण रघुनाथ त्रिभुवन, प्रदीप राजेंद्र त्रिभुवन (रा. लक्ष्मीनगर, शिर्डी, ता. राहाता) आणि सुरज लक्ष्मण नरवडे (पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १६७/२०२५, भारतीय न्याय संहिता ३१८ (४), १२६ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.फूल भांडार दुकान, जागा मालक, दुकान चालक आणि कमिशन एजंट सर्वांना आरोपी करण्यात आले आहे.पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी शिर्डी ग्रामस्थांनी ग्रामसभा आयोजित करून फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. ग्रामसभेत पोलिसांनी ठरवले की भाविकांची फसवणूक करणाऱ्या दुकानांवर थेट गुन्हे दाखल केले जातील; मात्र या निर्णयानंतरही युनायटेड किंगडमहून आलेल्या भाविकांची फसवणूक झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.पोलिसांनी आता कठोर पावले उचलत दुकानांवरील दरपत्रके आणि कठोर कारवाईचा इशारा दिल्याने अशा घटनांना आळा बसेल,अशी अपेक्षा आहे !
जागा मालकालाही आरोपी करणार
शिर्डीत साईभक्तांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.यापुढे फसवणूक झाल्यास जागा मालकालाही थेट आरोपी ठरवले जाणार असून शिर्डीतील हार-फुल आणि प्रसाद विक्री दुकानांवर पूजेच्या साहित्याचे दरपत्रक लावणे बंधनकारक असेल.