Ahilyanagar Breaking : मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीमुळे आठ मालमत्ताधारकांवर कारवाई !

चार व्यावसायिक गाळ्यांना महानगरपालिकेने ठोकले सील, चौघांचे नळ कनेक्शन तोडले, १००% शास्तीमाफीचा शेवटचा आठवडा; कारवाई तीव्र करणार : आयुक्त यशवंत डांगे

Tejas B Shelar
Published:

अहिल्यानगर – मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत १०० % सवलत दिली आहे. तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाईही सुरूच ठेवली आहे. मागील आठवड्यात सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने सात थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला होता. आता आणखी पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

चौघांचे व्यावसायिक गाळे सील करण्यात आले आहेत. तर, चौघांचे नळ कनेक्शन तोडून पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. शास्तीमध्ये सवलत देण्यात आल्यावर आत्तापर्यंत ३.१९ कोटींची थकबाकी जमा झाली आहे. १०० टक्के सवलतीसाठी शेवटचा आठवडा शिल्लक आहे. मालमत्ताधारकांनी शास्तीमध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा व कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने मालमत्ताधारक सचिन गुलाब मोहिते यांच्याकडे मालमत्ताकराची १ लाख ९५ हजार ५८० रुपये थकबाकी असल्याने त्यांचा गाळा सील करण्यात आला. मालमत्ताधारक श्रीमती कमल रोहिदास माळी यांच्याकडे गाळ्याची २ लाख ५५ हजार ६४० रुपये थकबाकी असल्याने त्यांचा गाळा सील करण्यात आला होता. कारवाई करताच त्यांनी संपूर्ण रकमेचा चेक जमा केल्याने कारवाई मागे घेण्यात आली.

मालमत्ताधारक शांतीलाल दत्तात्रय औटी यांच्याकडे मालमत्ता कराची ३ लाख २१ हजार २५२ रूपये थकबाकी असल्याने त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले. २४ जानेवारीपर्यंत पैसे न भरल्यास त्यांच्या राहत्या घराची खोली सील करण्यात येणार आहे. मालमत्ताधारक गिरवले यांच्याकडे मालमत्ताकराची १ लाख ७५ हजार १३ रुपये थकबाकी असल्याने त्यांचा गाळा सील करण्यात आला.

मालमत्ताधारक श्रीनाथ नागरी पतसंस्थाकडे मालमत्ताकराची २ लाख ४२ हजार ५१० रुपये थकबाकी असल्याने त्यांचे पूर्ण कार्यालय सील करण्यात आले. नागपूर उपविभागमधील महाकालेश्वर सोसायटी गृहनिर्माण संस्थेेकडे २६ हजार ८९० रुपये शास्ती वगळून थकीत असल्याने त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले.

सावेडी प्रभाग समिती हद्दीतील मालमत्ताधारक रंजया बालाया शिरसुल संजय यांच्याकडे मालमत्ता कराची ९४ हजार ४३० रुपये थकबाकी असल्याने त्यांचे दोन नळ बंद करण्यात आले. तसेच, मालमत्ताधारक अर्जुन पंडित घोडके यांच्याकडे मालमत्ता कराची १ लाख ६८ हजार ६४१ रुपये थकबाकी असल्याने त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले.

महानगरपालिका वसुलीसाठी सुरू असलेली कारवाई थांबणार नाही. थकबाकीदारांना शास्तीमध्ये सवलत देण्यात आली आहे. १०० टक्के सवलत घेण्यासाठी शेवटचा आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे याचा लाभ घेऊन तत्काळ कर भरणे अपेक्षित आहे. त्यानंतर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe