राहाता तालुक्यातील धनगरवाडी शिवारात नरभक्षी बिबट्याने चिमुकलीचा बळी घेतलाय. स्नेहल संतोष राशीनकर (वय 7) असे या चिमुकलीचे नाव आहे. जेवण करून हाथ धुण्यासाठी बाहेर गेलेल्या स्नेहलवर
पाण्याच्या टाकी लगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की राहाता तालुक्यातील धनगरवाडी दिघी शिवारात असलेल्या दत्त मंदिर येथे दि 26 मार्च रोजी रात्री नऊ च्या सुमारास जेवण करून हाथ धुण्यासाठी बाहेर गेलेल्या स्नेहल संतोष राशींनकर (वय 7) या चिमुकलीवर पाण्याच्या टाकी लगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला.

मानेला जबड्यात धरून ओढत नेत असताना कुटुंबातील सदस्य व शेजारील लोकांनी आरडा ओरड करत धाव घेतली असता बिबट्याने सुमारे शंभर फूट अंतरावर चिमुकलीला सोडून दिले. या जखमी चिमुकलीला तात्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा अंत झाला.
जिल्हा परिषद शाळेत पहिली इयत्तेत शिकणाऱ्या या चिमुकलीने या घटनेच्या दोन दिवस अगोदर शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन बक्षीस मिळविले होते. तिच्या या गोड आठवणीने शिक्षक वर्गातही हळहळ व्यक्त झाली आहे. या घटनेने धनगरवाडीसह वाकडी दिघी परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले. या परिसरात पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यात यावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
या घटनेने वाकडी, धनगरवाडी, चितळी शिवारातील ग्रामस्थ वन विभागवर तीव्र संतप्त झाले असून या परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावण्यात यावा व वन खात्याने दक्षता घ्यावी असे नागरिकांनी म्हटले आहे. परिसरात बिबट्याचा धुमाकूळ वाढला असता अजून किती बळी घेतल्यावर वन विभागाला जाग येईल असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.