श्रीराम नवमी निमित्त ६ एप्रिल रोजी सकल हिंदू समाजासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकी दरम्यान अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मिरवणुकीचे ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
६ एप्रिल रोजी शहरातून सकल हिंदू समाजासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने श्रीराम नवमी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत चार मंडळांनी परवानगी घेतली आहे. मिरवणुक पारंपारिक मार्गानेच नेणार असल्याची भूमिका हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने घेण्यात आली आहे. मात्र पोलिस प्रशासन नव्या मार्गावरून मिरवणूक काढण्याबाबत आग्रही आहे. त्यामुळे मिरवणुकी दरम्यान मिरवणूक मार्गावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून त्यात पोलीस अधीक्षक, २ पोलीस उपअधीक्षक, ७ पोलीस निरीक्षक, २५ पोलीस उप निरीक्षक, ५०० पोलीस अंमलदार, एसआरपी ची १ प्लाटुन, ५० होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी व्हिडिओ कॅमेरे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
पोलिस प्रशासनही तयारीत
दरम्यान, मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी तोफखाना पोलिस ठाण्यात दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक घेऊन उपअधीक्षक अमोल भारती यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस प्रशासनही तयारीत असल्याचा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे. दरम्यान, बंदोबस्तावेळी आवश्यक असलेल्या हेल्मेट, काठ्या, ढाल आदींची तपासणी सुरू आहे. आवश्यकतेनुसार नव्याने मागवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
काय आहे वाद ?
श्रीराम नवमी निमित्त शहरात सन २०१५ मध्ये पहिली मिरवणूक आशा टॉकीजमार्गे काढण्यात आली होती. त्यात वाद होऊन दंगल झाली होती. त्यानंतर २०१६ पासून मिरवणूक बॉम्बे बेकरी चांद सुलताना स्कूलमार्गे काढली जाते. मात्र, हिंदुत्ववादी संघटनांनी जुन्या आशा टॉकीज मार्गे च मिरवणूक काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. आमदार संग्राम जगताप यांनीही जुन्या पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिस प्रशासन मात्र नवीन मार्गावरच ठाम असून त्याची पाहणी करून बंदोबस्ताच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.