अहिल्यानगर – न्यायालयात शपथेवर खोटी साक्ष देणाऱ्याला चांगलाच फटका बसलाय. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एल. एस. पाढेन यांनी अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.
अहिल्यानगरात एका मिळकतीच्या वादावरून अश्रू यादव नरोटे, नरेश विष्णुपंत कोडम आणि जयश्री नरेश कोडम यांच्यात दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यात रूपेश प्रकाश कोडम याने नरेश विष्णुपंत कोडम आणि जयश्री नरेश कोडम यांच्या वतीने साक्ष दिली.

साक्ष देताना त्याने एका दस्तासाठी स्वतः उपस्थित असल्याचं शपथेवर सांगितलं. पण अश्रू यादव नरोटे यांनी माहितीच्या अधिकारातून काही कागदपत्रं मिळवली आणि हे सिद्ध केलं की, रूपेश साक्ष देताना कार्यालयात होता आणि त्याने शासकीय सेवेत रजाही घेतलेली नव्हती. ही कागदपत्रं त्यांनी न्यायालयात सादर केली.
यावरून असं दिसलं की, नरेश विष्णुपंत कोडम, जयश्री नरेश कोडम आणि रूपेश प्रकाश कोडम यांनी एकत्र येऊन खोटा पुरावा तयार करण्याचा कट रचला आणि खोटी साक्ष दिली. त्यांनी न्यायालयाची दिशाभूल केली आणि अश्रू यादव नरोटे यांच्या मिळकतीबाबत खोटा पुरावा उभा करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत अश्रू यांनी खासगी फिर्याद दाखल केली होती.
या फिर्यादीनंतर न्यायाधीश पाढेन यांनी भिंगार पोलिस ठाण्याला प्रथम या प्रकरणाचा अहवाल मागवला. पोलिसांनी अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याचं बारकाईने निरीक्षण केलं.
मग अश्रू यादव नरोटे यांच्या अर्जानुसार, भारतीय न्याय संहितेच्या कलम १७५ अंतर्गत भिंगार पोलिस ठाण्याला फिर्याद दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले. अश्रू नरोटे यांच्यासाठी गोरक्ष पालवे यांनी युक्तिवाद केला, तर ॲड. गुरविंदर पंजाबी, ॲड. रोहित बुधवंत, ॲड. सागर गर्जे आणि ॲड. अपेक्षा बोरुडे यांनी त्यांना मदत केली.