अहिल्यानगर तालुक्यातील कौडगाव येथे शेतजमिनीवरील ताबेमारीच्या वादातून एका कुटुंबाला जीवघेणी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित आरोपींनी दोघांना जातीवाचक शिवीगाळ करत संपूर्ण कुटुंबाला जेसीबीखाली घालून संपवण्याची धमकी दिली.
याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विक्रम भाऊसाहेब पाटोळे (वय ३८, रा. कौडगाव, ता. नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राम परसराम खर्से, परसराम तुकाराम खर्से, आणि गोकुळ आदिनाथ खर्से (तीघेही राहणार कौडगाव) या संशयितांनी त्यांच्या शेतजमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केले होते. तसेच, फिर्यादीच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यावर अडथळा निर्माण करून त्यांना त्रास दिला.

१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते १३ फेब्रुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत फिर्यादीच्या घरासमोर हा वाद सुरू होता. या कालावधीत संशयित आरोपींनी शेतातील विजेच्या केबल तोडून नुकसान केले. शिवाय, फिर्यादी आणि त्यांच्या आईला धक्काबुक्की करत जातीवाचक शिवीगाळ केली. “जर तुम्ही आमच्या शेजारी राहिलात, तर संपूर्ण कुटुंबाला जेसीबीखाली घालून संपवून टाकू,” अशी धमकी त्यांनी दिली.
याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले करत आहेत. घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती असून, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाळत ठेवली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.