Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा वर चष्मा दिसला व महाविकास आघाडीचा मात्र पूर्ण जिल्ह्यातून सुपडा साफ झाला. या सगळ्या विजयाचे शिल्पकार म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली असून सलग सातव्यांदा मंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
आपल्याला माहित आहे की राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या आठ टर्म पासून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली व ती यशस्वीपणे पार देखील पडली आहे
व त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचे विशेष असे एक महत्त्व आणि एक दबदबा असल्याचे आपल्याला दिसून येते. सलग सातव्यांदा त्यांना मंत्री पदाची संधी या माध्यमातून मिळाली. यामागील प्रमुख कारण जर आपण एक बघितले तर सहकार क्षेत्रातील त्यांचे नेतृत्वाची क्षमता आणि भाजप नेत्यांचा त्यांनी या निवडणुकीत सार्थ ठरवलेला विश्वास खूप महत्त्वाचा ठरला.
सहकार चळवळीतून नेतृत्व आले पुढे
राधाकृष्ण विखे पाटील यांची जर राजकीय कारकीर्द किंवा राजकीय कारकीर्दीची सुरुवात बघितली तर त्यामागे सहकार चळवळ खूप महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या घरातूनच सहकार चळवळीची पार्श्वभूमी लाभली आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची राजकीय आणि सामाजिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रामध्ये विविध संस्थांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले व या पदांना योग्य न्याय देखील दिला.
सहकार क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन गोष्टींची निर्मिती केली. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्र तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये देखील त्यांनी कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे व त्यांनी आपल्या दूरदृष्टीतून विविध शैक्षणिक संस्थांचा पाया अधिक भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून काम केले आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास पूर्ण झालेली 75 वर्ष असो किंवा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची यशस्वी पन्नास वर्षांची वाटचाल असो यामध्ये त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या प्रवरा सहकारी बँकेस पूर्ण झालेली पन्नास वर्ष व या पन्नास वर्षातील बँकेची यशस्वी कामगिरी या सर्वांमागे राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभ्यासू नेतृत्व खूप फायद्याचे ठरले आहे.
साधारणपणे 1995 या वर्षापासून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. हे प्रतिनिधित्व करत असताना राहता तालुक्याची निर्मिती ते अलीकडच्या कालावधीत स्थापन करण्यात आलेली अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व त्यासोबत शिर्डी विमानतळ व त्या विमानतळाचा विकास व न्यायालयाचे स्वतंत्र इमारत असे डोळ्यात भरतील अशा स्वरूपाची कामे त्यांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यामागे विखे पाटील यांचा मोठा हात आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
घेतलेले लोकहिताचे निर्णय
1997 ते 1999 या कालावधीमध्ये राज्यात भाजप सेनेचे सरकार होते व तेव्हा ते कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय खात्याचे मंत्री होते व त्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यावेळी ऍग्रो एडवांटेज हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख दाखवून दिली होती.
इतकेच नाही तर शालेय शिक्षण, विधी व न्याय, परिवहन, बंदरे विकास आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे व त्या माध्यमातून प्रत्येक विभागासाठी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. अनुदानित शाळांसमोर अगोदर जो काही कायम हा शब्द लावला जायचा तो शब्द काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला व त्यामुळेच राज्यातील अनुदानित शाळांचा प्रश्न सोडवण्यामध्ये यश मिळाले.
इतकेच नाहीतर राज्यामध्ये स्कूल बसचे धोरण देखील त्यांच्या कारकीर्दीतच लागू करण्यात आले.तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने तीन औद्योगिक वसाहतींसाठी जागा उपलब्ध करून दिली.
बहुप्रत्यक्षित असलेल्या निळवंडे धरण कालव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरण करण्यासाठी आणलेल्या दोनशे कोटींचा निधी, सावळी विहीर येथे मंजूर झालेले शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, काकडी विमानतळासाठी 600 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विमानतळाच्या विकासाला मिळालेली चालना असो
किंवा युवकांना रोजगार मिळवण्यासाठी शिर्डीतील औद्योगिक वसाहत, अहिल्यानगर शहरांमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणे आणि नेवासे येथील ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी या कामांचा त्यांनी संकल्प केला आहे.