शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील पुजारी नामदेव रामा दहातोंडे यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २६ जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या पुजाऱ्याचा शोध घेत असताना गुरुवारी रात्री त्यांच्या मुंडक्याचा शोध लागला, तर शुक्रवारी संध्याकाळी दुसऱ्या विहिरीत त्यांचे उर्वरित शरीर सापडले. या घटनेमुळे बोधेगाव भागात प्रचंड खळबळ उडाली असून, भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
२६ जानेवारीपासून अचानक बेपत्ता…
बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. १४ वर्षांपासून येथे सेवा देणारे पुजारी नामदेव दहातोंडे २६ जानेवारीपासून अचानक बेपत्ता झाले. याबाबत एकनाथ घोरतळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.

संपूर्ण गावात भीतीचे वातावरण
गुरुवारी रात्री गावातील सुशीलाबाई पाटीलबा तांबे यांच्या विहिरीतून दुर्गंधी आल्याने ग्रामस्थांनी पाहणी केली असता पुजाऱ्याचे मुंडके आढळले.गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. बोधेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा मुंडके बाहेर काढले. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले. तपास सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी अविनाश कदम यांच्या विहिरीत पुजाऱ्याच्या उर्वरित शरीराचे अवशेष आढळले.
पोलिसांची तत्परता
या क्रूर हत्येच्या तपासासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक सुनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसेतज्ञ आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला असून, या हत्येच्या मागचे कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
गावात संतापाची लाट
मूळचे नागलवाडी, ता. शेवगाव येथील रहिवासी असलेले दहातोंडे यांचे कुटुंब हत्येमुळे हादरले आहे. त्यांना पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे. या अमानुष हत्येचा निषेध म्हणून ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी बोधेगावमध्ये कडकडीत बंदचे आवाहन केले आहे.
संशयित आरोपी ताब्यात…
या हत्येच्या तपासात संशयित म्हणून एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, हत्या का झाली? कोणत्या कारणामुळे हा प्रकार घडला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गावात विविध चर्चांना उधाण आले असून, पोलिस तपासाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
ग्रामस्थ एकवटले
भाविक आणि ग्रामस्थांनी एलसीबीकडे (स्थानिक गुन्हे शाखा) तपास सोपवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. वरिष्ठ अधिकारी संपूर्ण घटनाक्रमाचा अभ्यास करत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.