अहिल्यानगर: ६६ वी महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक अहिल्यानगर जिल्ह्याने पटकावले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत येथे महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ५७ किलो वजनी गटामध्ये गादी विभागात अहिल्यानगर जिल्ह्याने पहिले सुवर्णपदक पटकावले. कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील सचिन मुरकुटे याने मुंबई शहरचा सचिन चौगुले यास एक चाकी डाव टाकत चिटपट केले. आणि पहिले सुवर्णपदक पटकावले. यावेळी उपस्थित हजारो प्रेक्षकांनी जल्लोष केला.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आमदार रोहित पवार मित्रपरिवार व अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गादी आणि माती विभागातील तसेच महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील कुस्त्यांना प्रारंभ झाला. ५७ किलो वजनी गटामध्ये अंतिम फेरीमध्ये अहिल्यानगरचा सचिन मुरकुटे यांनी मुंबईचा सचिन चौगुले यांचा पराभव केला.