राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी शेतकरी विठ्ठल हापसे (वय ५७) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी तो अद्याप मोकाट फिरत आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा शेतात बिबट्याला पळताना पाहिले आहे. त्यामुळे हा एकच बिबट्या आहे की परिसरात एकाहून अधिक बिबटे आहेत, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा ते पावणे बाराच्या सुमारास, विठ्ठल हापसे हे आपल्या शेतात गिन्नी गवत कापत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने, ते मोठ्या प्रयत्नाने बचावले, मात्र या घटनेमुळे गावात भितीचे सावट निर्माण झाले आहे.
वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला असला तरी बिबट्या त्यात अडकण्याऐवजी परिसरात मुक्त संचार करत आहे.
गेल्या काही दिवसांत शेतकरी देवराम ठाकर, बाळासाहेब शिंदे, शरद पोटे, वसंतराव पोटे, भास्कर भिंगारे आणि शिवाजी थोरात यांनी बिबट्याला वेगवेगळ्या भागांत सलग दोन-तीन दिवस पाहिले आहे.
यामुळे, परिसरात एकच बिबट्या आहे की अधिक बिबटे आहेत, याविषयी ग्रामस्थांमध्ये शंका निर्माण झाली आहे. वन विभागाने अधिक चौकशी करून या भागातील बिबट्यांची संख्या निश्चित करण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
या घटनेनंतर गावातील महिला आणि लहान मुले शेतात जाण्यास घाबरत आहेत. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही भीती पसरली असून, बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.
गावोगावी बिबट्यांची संख्या वाढत असल्याने वन विभागाने अधिक पिंजरे लावून त्यांना जेरबंद करावे आणि सुरक्षित जंगल किंवा वाघ प्रकल्पात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मानोरी परिसरात बिबट्याचा वाढता वावर हा शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी धोक्याचा विषय बनला आहे. वन विभागाने यावर वेळीच उपाययोजना न केल्यास आणखी गंभीर घटना घडू शकतात.