अहिल्यानगर – महानगरपालिकेमार्फत शहरातील नागरिकांच्या सर्व प्रकारच्या मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. मालमत्तांची नव्याने मोजमापे घेऊन त्यानुसार कर आकारणी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शहरातील ४७ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यात इमारती, घरांच्या बांधकाम क्षेत्राच्या नोंदींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे घरपट्टीतून मिळणारे उत्पन्न वाढणार आहे. नागरिकांनी सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
महानगरपालिकेने मे.सी.ई.इन्फोसिस्टीम लि. नवी दिल्ली या कंपनीमार्च्याफत महानगरपालिका हद्यीतील इमारती व मोकळ्या जागांच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले आहे. संपूर्ण शहरात काम प्रगती पथावर आहे. या कामाचा शुक्रवारी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे आढावा घेतला. सर्व प्रभाग अधिकारी, सर्व कर निरिक्षक, कंपनीचे प्रतिनिधी रविंद्र साहू व रोहित राजू, सहाय्यक कर निर्धारक व संग्राहक विनायक जोशी, मालमत्ता कर विभागातील कामकाजावर देखरेख करणारे सचिन उगले आदी उपस्थित होते.

बैठकीत कंपनीच्या प्रतिनिधींनी शहरात ४७,००० मिळकतींचे सर्व्हेक्षण झाल्याचे सांगितले. कामकाजात कंपनीचे प्रतिनिधी, वसुली लिपिक हे वॉर्डमध्ये स्वतः उपस्थित राहून कामकाज पूर्ण करणार आहेत. ज्या भागात सर्वेक्षण होणार आहे, त्या भागातील मालमत्ताधारकांना स्लीप वाटप करण्यात येऊन पुर्वसुचना दिली जाते. सर्व्हेक्षणाबाबत कुठलीही तक्रार असल्यास स्लीपवर कंपनीचे प्रतिनिधी व सहाय्यक मुल्य निर्धारक कर संग्राहक यांच्या दिलेल्या भ्रमणध्वनीवरून संपर्क करावा.
सर्वेक्षणात जे मिळकत धारक सहकार्य करणार नाही, अशा मिळकतींचे बाह्य स्वरूपातील मोजमाप घेऊन त्यानुसार आकारणी करण्यात येईल, असे सांगत नागरिकांनी अचूक कर आकारणी व्हावी, यासाठी सर्वेक्षणात सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.