श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल फरण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (ता. १४) पीडित महिला आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी श्रीरामपूर रेल्वेस्थानकावर आली होती.
मात्र, तेथे एका गणवेशातील व्यक्तीने तिला गाठले आणि आपण रेल्वे पोलिस व सेवानिवृत्त सैनिक असल्याचे स्यांगितले. त्याने महिलेची ओळख वाढवून श्रीरामपूरमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मंगळवारी (ता. १८) आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करून तिला पुन्हा श्रीरामपूर येथे बोलावले. त्यानंतर तिला काही ठिकाणी नेले.

त्यानंतर एका इमारतीच्या तळघरात नेले. तेथे बंद खोलीत तिच्यावर शारीरिक अत्याचार केला, तसेच मी पोलिस आहे, कुणाला काही सांगितले, तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास श्रीरामपूर बसस्थानकातून छत्रपती संभाजीनगरच्या बसमध्ये बसवून दिले.
पीडित महिला छत्रपती संभाजीनगर येथे न जाता टाकळीभान येथे बसमधून खाली उतरली. पुन्हा श्रीरामपूर येथे परत येत तिने मैत्रिणींना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून रेल्वे पोलिस ज्ञानदेव आढाव (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रेल्वे पोलिस ज्ञानदेव आढाव यांनी सदर महिलेशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. या महिलेने रेल्वे पोलिस दलात नोकरी लावून देण्याची विनंती केली होती. मात्र आपण त्यास नकार दिला. त्यानंतर १८ मार्च २०२५ रोजी संबंधित महिलेने राम मंदिर परिसरात भेटण्यासाठी बोलावले. या भेटीदरम्यान, तिने एक कोटी रुपयांची मागणी केली; अन्यथा अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असा अर्ज आरोपी पोलिस कर्मचाऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षक आणि गृहमंत्रालयाकडे पाठविला आहे.