स्व.मनोज कुमार यांचे नुकतेच निधन झाले अन त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले, परंतु जास्त दुःख झालं ते साई भक्तांना. मनोज कुमार आणि शिर्डी यांचं एक खास नातं होत. मनोज कुमार यांनी प्रथम ‘शिर्डी के साईबाबा” हा सिनेमा काढला आणि देश विदेशात शिर्डी प्रसिद्ध झाली आणि लाखो भाविकांचा ओघ शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला सुरु झाला.
मनोज कुमार यांनी अनेक देशभक्तीपर चित्रपट काढून राष्ट्रभक्तीचे बीज भारतवासीयांमध्ये रुजवले. यामुळे मनोज कुमार हे भारत कुमार म्हणून पण ओळखले जात होते. त्यांची शिर्डी परिसराशी भावनिक नाळ होती.साई भक्तांच्या दृष्टीने त्यांच्या “शिर्डी के साईबाबा” या १९७७ साली प्रदर्शित चित्रपटातील भूमिकेने अनन्यसाधारण स्थान मिळवले. एका शंका घेऊन आलेल्या डॉक्टरचे साईबाबांवरील गाढ श्रद्धेत झालेले रूपांतरण प्रवास त्यांनी हृदयस्पर्शी पद्धतीने साकारला. या चित्रपटामुळे देशभरात साईबाबांविषयी श्रद्धा वाढीस लागली.

त्यांच्या या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ शिर्डीतील पिंपळवाडी रोड या मुख्य रस्त्याला “मनोज कुमार गोस्वामी रोड” असे नाव दिले आहे. मनोज कुमार यांना पद्मश्री (१९९२) व दादासाहेब फाळके पुरस्कार (२०१५) या मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल साईभक्तांनी दुःख व्यक्त केले. शिर्डी संस्थानच्या संकेत स्थळावर देखील याबाबत उल्लेख केला असून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले आहे.