Ahilyanagar News : अहिल्यानगर पुणे महामार्गावर दुचाकीस्वारास अडवलं, नंतर केलं असं काही…

Published on -

Ahilyanagar News : अहिल्यानगर पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीय, नगर-पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवाशांना रस्त्यात अडवून मारहाण करत लुटण्याचे प्रकार वारंवार घडत असून, आणखी एक अशीच घटना घडली आहे.

दुचाकीवर चाललेल्या प्रवाशाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, तसेच दुचाकी दोघा लुटारूंनी नेल्याची घटना कामरगाव (ता. नगर) शिवारातील सुवर्णज्योत हॉटेल जवळ २७एप्रिल रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

लुटारूंच्या मारहाणीत जखमी झालेल्या युवराज दत्तपंत नाईकवाडे (वय ३७, रा. खेर्डा बुद्रुक, ता. गेवराई, जि. बीड, हल्ली रा. डेरंगे वस्ती कोरेगाव भीमा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दवाखान्यात उपचार घेत असताना नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी २९ एप्रिल रोजी दुपारी दोघा लुटारुंवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी युवराज नाईकवाडे हे कामानिमित्त कोरेगाव भीमा येथे वास्तव्यास असून ते २७ एप्रिल रोजी रात्री त्यांच्या मूळ गावाहून नगरमार्गे कोरेगाव भीमाकडे त्यांच्या बजाज डिस्कव्हर कंपनीच्या मोटारसायकल (क्र. एम एच २३ व्ही २३५१) ने रात्री १२ च्या सुमारास कामरगाव शिवारातून जात होते.

हॉटेल सुवर्णज्योत जवळ त्यांना दोन चोरट्यांनी अडवून दगड व लाथा बुक्क्‌यांनी बेदम मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने ते जखमी झाले. चोरट्यांनी त्यांच्याकडून ८ हजार रुपये रोख रक्कम, मोटारसायकल व दोन मोबाईल असा ऐवज चोरून नेला.

घटनेनंतर जखमी झालेल्या नाईकवाडे यांना तेथे जमा झालेल्या नागरिकांनी उपचाराकरिता दवाखान्यात पाठविले. तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात युवराज नाईकवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News