मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १४, १६, १९ वयोगटातील मुलांची सध्या संघनिवड सुरू आहे. चौदा वर्षाखालील मुलांची संघनिवड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एसएससीए कल्याण ग्राउंड वर गेले चार दिवस ट्रायल घेऊन करण्यात आली. संघात मूळचा राहाता तालुक्यातील खडकेवाके येथील रहिवासी असलेले सध्या डोंबिवली येथे स्थायिक असलेल्या शार्दूल अनिल मुरादे याची निवड करण्यात आली.
शार्दूल हा अष्टपैलू खेळाडू असून तो उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. तसेच मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज आहे. हजारो मुलांमधून निवड झालेला शार्दूल हा रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांचे कोच द्रोणाचार्य दिनेश लाड यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. तसेच प्रशिक्षक नितीन बारहाते, संतोष पाठक, परेश यांचे त्याला मार्गदर्शक लाभत आहे.

शार्दूल सध्या बोरीवली येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षण घेत असून डोंबिवली येथील शिक्षक अनिल मुरादे यांचा मुलगा आहे व शिर्डी पंचक्रोशीतील खडकेवाके येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती मुरादे यांचा नातू आहे. चौदा वर्षाखालील संघात निवड झालेला शार्दूल हा बारा वर्षाचा सर्वात लहान खेळाडू आहे. त्याच्या कामगिरीबद्दल राहाता, शिर्डी पंचक्रोशीत कौतुक होत आहे.