आयपीएल क्रिकेट म्हणजे क्रीडारसिकांचे जीव की प्राण. आयपीएल जसे क्रीडा रसिकांसाठी मेजवानी असते तसेच सट्टा लावणाऱ्यांसाठी देखील ही एक पर्वणी असते. आयपीएल सुरु होताच अहिल्यानगर जिल्ह्यात ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी बुकी सक्रिय झालेत. सध्या या सट्टेबाजाराकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक वेबसाईटच्या लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा खेळला जातो. वेबसाईट बाहेरच्या असल्या तरी त्यांचे बुकी सर्वत्र असतात. अहिल्यानगर शहरातही पाच ते सहा प्रमुख बुकी असल्याची चर्चा आहे. गतवेळी नगर शहरातील एका बड्या बुकीला अटक करण्यात आली होती. हे बुकी ग्राहकांकडून रोख स्वरुपात पैसे घेतात. त्याच्या बदल्यात सोशल मीडियावर आयडी व पासवर्ड पाठवतात. हा पासवर्ड मिळाल्यानंतर वेबसाईटवर जाऊन सट्टा खेळता येतो.

अनेकजण झाडाखाली मोबाईलवरून सट्टा लावतात. तशा घटना यापूर्वी उघडकीस आलेल्या आहेत. यावेळी पोलिसांची सट्टेबाजारावर नजर असणार आहे. पोलिसांची नजर चुकवून बुकींनी पासवर्ड व आयडी देण्यास सुरुवात केली असून, क्रिकेट स्पर्धा सुरू होताच सट्टेबाजारही खुला होणार असल्याची चर्चा आहे.
अहिल्यानगर शहरासह उपनगरांत सहा प्रमुख बुकी आहेत. रोख स्वरुपात पैसे घेऊन हे बुकी आयडी व पासवर्ड देतात. त्यासाठी हे बुकी लहान मुलांचाही वापर करत असून, पैशांची देवाण-घेवाणही त्यांच्याच मार्फत केली जाते. अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर पोलिसही कारवाई करत नाहीत. त्यामुळे अशा गुन्ह्यांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले.
शहरासह उपनगरांतील तरुणांमध्ये सट्टेबाजाराची क्रेझ आहे.
अनेकजण कमी वेळेत पैसे कमावण्यासाठी सट्टेबाजारात उतरतात. यामुळे अनेकजण कंगाल होतात. सट्टेबाजारामुळे कर्जबाजारी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. काहींनी घरदार विकून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणांमध्ये ऑनलाईन सट्टा, गेमिंगबाबत आकर्षण आहे. यातूनच सुरुवातीस हजार, दोन हजार रुपये खेळतात. नंतर हीच मुले लाखो रुपयांचा सट्टा लावतात.
पोलिसांची राहणार नजर !
पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले की, आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान सट्टेबाजारावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. सट्टा खेळताना कुणी आढळून आल्यास संबंधितांवर कड़क कारवाई केली जाईल असा इशाराच त्यांनी दिलेला आहे.