अहिल्यानगरमधील शेतकरी हे नेहमीच विविध प्रयोग करत असतात. आता अकोले सारख्या दुर्गम भागात काळीमिरी पिकवण्याचाच प्रयोग येथील शेतकऱ्याने केलाय. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ तथा वनौषधी अभ्यासक सेवानिवृत्त प्राध्यापक रामलाल हासे यांनी अथक प्रयत्नातून आपल्या महाळदेवी येथील शेतावर काळी मिरीचे पीक यशस्वीरित्या घेतले आहे.
पर्यावरणाचा गाढा अभ्यास असणारे रामलाल हासे यांना 2020 मध्ये कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व आत्माचे तालुका समन्वयक बाळनाथ सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

डोंगरमाथ्या लगत असलेल्या आपल्या वडिलोपार्जित शेतातील घरासमोर असलेल्या आंबा, फणस व जांभूळ या फळझाडांच्या आधाराने त्यांनी काही निवडक काळी मिरीची रोपे कोकणातून आणून लागवड केली होती. सण 2020 मध्ये त्यांनी सुमारे 8 काळी मिरीची रोपे लागवड केली होती.
शास्त्रयुक्त पद्धतीने या रोपांच्या संगोपन केल्यानंतर त्यांना गेल्या हंगामापासून मिरीचे उत्पादन सुरू झाले. गेल्या वर्षी त्यांनी आठ किलो काली मिरी उत्पादन घेतले होते. यंदाच्या हंगामातही त्यांनी दहा किलो मिरीचे उत्पादन घेतले आहे.
अतिशय दर्जेदार व उत्कृष्ट दर्जाचे मिरी अकोले तालुक्यात निर्माण होऊ शकते याचे उदाहरण त्यांनी शेतकरी वर्गासमोर ठेवले आहे. अत्यंत मेहनती व प्रयोगशील असणारे रामलाल हासे हे वनौषधी लागवडी विषयही मोठे अभ्यासक मानले जातात. त्यांच्या अभ्यासू व मेहनती वृत्ती मुळे मसाल्याचे महागडे मानले जाणारे काळे मिरे अकोल्यातही यशस्वीपणे लागवड होऊ शकतात हे आता सिद्ध झाले आहे.
साधारणपणे वाळलेल्या काळे मिऱ्यांचा एका किलोचा सध्याचा बाजार भाव हजार ते बाराशे रुपये प्रति किलो आहे. रामलाल हसे यांनी पायोनियर मिऱ्यांचा वाण आपल्या शेतावर लावलेला आहे.
वेंगुर्ला येथील कृषी संशोधन केंद्रातून त्यांनी ही रोपे आणली होती. त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरील बांधांवर लागवड केलेल्या विविध फळझाडांचा आधार घेऊन मिरची लागवड करावी असे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.