जम्मू – काश्मीर मधील पहलगाम मध्ये २२ एप्रिलला दुपारी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २८ जण मृत्युमुखी पडले. त्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश असून या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. नगर शहरातही पोलिस यंत्रणेने दक्षता घेत शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर चौकाचौकात सायंकाळी अचानक नाकाबंदी करत वाहनांची तपासणी मोहीम राबविली.
कोतवाली पोलिसांनी इम्पेरियल चौक येथील नाकाबंदीत फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा असलेली चारचाकी वाहने, तसेच संशयित वाहनांची कसून तपासणी केली. यावेळी फॅन्सी नंबर प्लेट, विनाक्रमांकाची वाहने, ट्रिपल सीट जाणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करत काचांवर लावलेले ब्लॅक फिल्म काढण्यात आल्या.

कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, महिला पोलिस उपनिरीक्षक शितल मुगडे, पोलिस अंमलदार विजय काळे, गुलाब शेख, प्रशांत बोरुडे, विशाल दळवी, सोमनाथ केकान, सोमनाथ राऊत, लक्ष्मण बोडखे, महिला अंमलदार योगिता साळवे, श्वेता परमासागर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत ही मोहीम राबविली.
नाकाबंदीची ही मोहीम सातत्याने अचानक पणे राबविण्यात येणार असून वाहनचालकांनी फॅन्सी नंबर प्लेट, वाहनांना काळ्या काचा लावू नये, ट्रिपल सीट टू व्हीलर वर फिरू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे. दरम्यान तोफखाना पोलिसांनीही पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक येथे तपासणी नाकाबंदी मोहीम राबविली. या मोहिमेत अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली.