Ahilyanagar News : अकोले तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटक स्थळ हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून सुमारे १६०० फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय २१) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. ही घटना कशी घडली? अपघात की घातपात? याचा तपास पोलीस करत आहेत. ऋषिकेश जाधव हा नेमका कशासाठी हरिश्चंद्रगडावर गेला होता, तो एकटा होता का, त्याच्यासोबत कुणी होते, या सर्व बाबी तपासल्या जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त राहत होता. सोमवारी दि.१० मार्च रोजी ऋषिकेशशी फोनवरून संपर्क न झाल्याने आई-वडिल नाशिकला आले. त्यानंतर त्यांनी त्याचा त्या ठिकाणी शोध घेतला. तो मिळून न आल्याने त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत मंगळवार दि.११ मार्च रोजी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्या मित्रांकडे नातेवाईकांनी चौकशी केली असता मित्रांनी तो मोटारसायकलवरून हरिचंद्र गडाकडे गेला असल्याचे सांगितले.

ऋषिकेश जाधव बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी हरिश्चंद्रगडाच्या दिशेने शोधमोहीम सुरू केली. शोध घेत असताना त्याची मोटारसायकल पार्किंगमध्ये उभी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा परिसरात शोध घेतला असता १६०० फूट खोल दरीत मृतदेह दिसून आला. ही माहिती मिळताच राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर मृतदेह ऋषिकेशच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.