Ahilyanagar News : नगर शहरात दोन गटात हाणामारी ! तलवार, रॉड, दांडक्याने मारहाण

Published on -

शहरातील घासगल्ली येथे दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या हाणामारीत एका तरुणाच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आला, तर दुसऱ्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत खान फैज अनवर वहीद अहमद (तांबटकर) आणि त्याचा भाऊ रैयान वाहीद अहमद खान (तांबटकर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपचारादरम्यान खान फैज अनवर वहीद अहमद यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईस्माईल इकबाल पवार, आरफान इकबाल पवार, माजीद इकबाल पवार, अनवर यासीन जिशान तांबटकर, निसार पवार (सर्व रा. शहाजीरस्ता, घासगल्ली, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मंगळवारी (११ मार्च) रात्री ८ वाजता घासगल्ली मस्जिदसमोर यासीन अरफाक शेख आणि आरफान इकबाल पवार यांच्यात शाब्दिक वाद सुरू होता.

भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी तेथे गेले असता
आरफानने त्यांना शिवीगाळ केली आणि आमच्या भांडणात पडू नकोस असे म्हणत धमकावले. यानंतर फिर्यादी आपल्या दुकानात परत आले. रात्री ८.४५ च्या सुमारास ईस्माईल इकबाल पवार, आरफान इकबाल पवार, माजीद इकबाल पवार, जिशान अनबर तांबटकर, यासीन निसार पवार हे सर्वजण फिर्यादीच्या दुकानासमोर आले आणि शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी अचानक फिर्यादी आणि त्यांचा भाऊ रैवान यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

या हल्ल्यात इस्माईल इकबाल पवार याने तलवारीने फिर्यादीच्या डोक्यावर जोरात वार केला, तर आरफान इकबाल पवार याने लोखंडी रॉडने रैवान खानच्या डोक्यावर प्रहार केला. माजीद इकबाल पवारने लाकडी दांडक्याने मारहाण केली, तर जिशान अनवर तांबटकर आणि यासीन निसार पवार यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe