अहिल्यानगरमधून एक दोन गटात तुंबळ मारहाणीची बातमी समोर आली आहे. राहुरीमध्ये ही भांडणे झाले असून गज, चाकू, चॉपरने तुंबळ हाणामाऱ्या दोन गटात झाल्या आहेत. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून या घटनेत सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गौरव राजेंद्र रणसिंग (वय २२, रा. आझाद चौक, राहुरी) याने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. १७ मार्च रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गौरव रणसिंग त्याचा भाऊ श्रीकांत उर्फ साहील रणसिंग, ऋतिक काशिनाथ रणसिंग हे शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचत होते. तेथे आरोपी आल्याने गौरव रणसिंग व त्याचे भाऊ तेथून निघाले व आझाद चौक येथील स्वामी विवेकानंद वाचनालयाजवळ येऊन गप्पा मारत तेथेच बसले. तेथे आरोपी आले व त्यांनी शिवीगाळ करून लोखंडी गजाने मारहाण करून चॉपरने वार केले. या घटनेत श्रीकांत उर्फ साहील रणसिंग, गौरव रणसिंग, ऋतिक रणसिंग हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी प्रज्वल प्रशांत खैरे (रा. आझाद चौक), आकाश नंदकुमार शिरसाठ (राहुरी खुर्द), स्वयंम महेश जंगम (जंगम गल्ली, राहुरी) या तिघांवर जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या फिर्यादीत सागर चंद्रकांत खैरे (वय ४२, रा. आझाद चौक) याने म्हटले आहे की, श्रीकांत रणसिंग हा नेहमी सागर खैरे यांच्या पुतण्याकडे त्रास देण्याच्या उद्देशाने पाहत असतो.
दि. १७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सागर खैरे यांचा पुतण्या प्रज्वल, स्वयंम जंगम व आकाश शिरसाठ हे आझाद चौक येथे घरासमोर बसलेले होते. त्यावेळी तेथे आरोपी दारू पिवून आले व प्रज्वल यास म्हणाले की, तु माझ्याकडे रागाने का पाहतो? तुला राहुरीत रहायचे आहे का? असे म्हणून शिवीगाळ करू लागले.
तेव्हा प्रज्वल त्यांना म्हणाला की, तुम्ही मला शिवीगाळ का करता, असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने आरोपींनी त्यांना लोखंडी गज व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून प्रज्वल याच्यावर चाकूने वार केले. या घटनेत प्रज्वल खैरे हा जखमी झाला आहे. याप्रकरणी श्रीकांत काशीनाथ रणसिंग, गौरव राजेंद्र रणसिंग, अभिजीत राजेंद्र रणसिंग, ऋतिक काशीनाथ रणसिंग (सर्व रा. लोहार गल्ली, राहुरी) या चार जणांवर शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.