Ahilyanagar News : अहिल्यानगर मध्ये भाविकांना मिळणार उसाचा रस, ४० टन उसाचे होणार गाळप

Published on -

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र चिचोंडी शिराळ येथे जैन धर्माचार्य राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये अक्षय्यतृतीयेच्या दिवशी राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या सुमारे ४०० तपस्वी साधकांच्या तपाचे पारणे विविध साधू-साध्वींच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, उसाचा रस घेत उपवासाची सांगता होणार आहे, या वेळी आलेल्या भाविकांना उसाचा रस दिला जाणार असून, यासाठी जिल्ह्यातून सुमारे ४० टन उस मागविण्यात आला आहे.

तप साधनेचा प्रवास साडेतेरा महिन्यांचा आहे. यामध्ये एक दिवस निरंकार उपवास तर एक दिवस धर्म साधना अशाप्रकारे उपवास करून शरीर, विचार, मन, बुद्धी व क्रिया अशी सर्व प्रकारची शुद्धी साधना केली जाते. अशा साधनेला सर्वश्रेष्ठ समजले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक साधना करतात.

चिचोंडी ही आचार्य आनंदऋषीजींची जन्मभूमी असल्याने येथे येऊन उपवासाची सांगता करावी, अशी भाविकांची भावना असते. भगवान ऋषभदेव यांनी अशा प्रकारची साधना करत उच्चकोटीचे ज्ञान प्राप्त केले. त्यांनीसुद्धा अक्षय्यतृतीयेच्या दिवशी ‘इक्षु’ रस म्हणजे उसाचा रस घेऊन पारणे केले.

राज्याच्या विविध जिल्ह्यांसह राजस्थान, कनॉटक, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, राज्यातील भाविक मंगळवारी म्हणजे अक्षय्यतृतीयेच्या आदल्या दिवशी येथे येतील. मुख्य सोहळा बुधवारी (दि.३०) एप्रिल अक्षय्यतृतीयेला होईल.

यासाठी जैन धर्म उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराज यांच्यासह अनेक साधू – साधवी चिचोंडीत दाखल झाले आहेत. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी चिचोंडी परिसर सज्ज झाला असून, उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा अक्षय्यतृतीया सोहळा पार पडणार आहे.

योगेश बोरा, सुधीर शिंगवी, कमलेश गुगळे, आनंद गुगळे, अभय गुगळे, सतीश मुनोत, संतोष गुंदेचा, रितेश मुनोत, संजय मुनोत, संतोष गुगळे, विनोद मेहेर, ललित मुनोत, पिंटू परमार, व्यवस्थापक संजय गुगळे, संजय आव्हाड यांच्यासह सर्व आनंद भक्तांनी या उसाच्या रस वाटपाचे नियोजन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe