स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात.२५ मार्च रोजी ही कारवाई केली असून यातील पाचही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. बुरुडगाव रोड वरील साईनगर येथील योगेश चंगेडीया यांचे घरावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न यांनी केला होता.
सागरसिंग बलबीरसिंग जुन्नी, (वय २५, रा. संजयनगर, काटवन खंडोबा), गोपाल राजू नायडू, (वय ३४, रा. संजयनगर, काटवन खंडोबा), सोनू शरद शिंदे, (वय २९, रा. भोसले आखाडा), सोनूसिंग रणजितसिंग जुन्नी, (वय २१), सतनामसिंग जीतसिंग जुन्नी (वय २३, दोघे रा. संजयनगर, काटवन खंडोबा रोड) अशी या आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी : बुरूडगाव रोडवरील साई नगर येथे राहणारे व्यावसायिक योगेश श्रीकांत चंगेडीया, (वय ४५) यांचे राहते घराचे खिडकीचे शटर कटरच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करून दरोड्याचा प्रयत्न २२ मार्चला पहाटे करण्यात आला होता.
मात्र चंगेडीया कुटुंब जागे झाल्याने आणि त्यांनी शेजारच्या लोकांना फोन करून जागे करत आरडाओरडा केल्याने दरोडेखोर पळून गेले होते. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ चे कलम ३०९ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या संदर्भात २ दिवसांपूर्वी बुरूडगाव रोड परिसरातील रहिवासी नागरिक व व्यापाऱ्यांनी आ. संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या समवेत पोलीस अधिक्षक राकेश ओला यांची भेट घेत साई नगर परिसरात गेल्या ६ महिन्यांपासून सुरु असलेल्या चोऱ्या, घरफोड्यांचा तपास लावावा अशी मागणी केली होती.
त्यामुळे पोलिस अधिक्षक ओला यांनी या गुन्हयांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबतचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, गणेश लोंढे, शाहीद शेख, फुरकान शेख, रविंद्र घुंगासे, अमृत
आढाव, मयूर गायकवाड, जालींदर माने, विशाल तनपुरे, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड यांचे पथक नेमुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत पथकास रवाना केले.पथक कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नमूद गुन्ह्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना हा गुन्हा सागरसिंग जुन्नी याने त्याचे साथीदारासह केल्याचे समोर आले.
पथकाने निष्पन्न आरोपीचा शोध घेऊन सागरसिंग बलब बलबीरसिंग जुन्नीयास ताब्यात घेतले. त्यास त्याचे साथीदाराबाबत विचारपूस केली असता त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पथकाने इतर आरोपींचा नगर शहरामध्ये शोथ घेऊन गोपाल नायडू, सोनू शिंदे, सोनूसिंग जुन्नी, सतनामसिंग जुन्नी या चौघांना ताब्यात घेतले.
कल्याण रोड येथून चोरली होती मारुती इको गाडी ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची माहिती सांगीतली. तसेच ताब्यातील आरोपीकडे त्यांनी गुन्हयात वापरलेली मारुती कंपनीची इको गाडीबाबत विचारपूस केली असता गुन्हयातील इको गाडी ही जाधव पेट्रोलपंप कल्याण रोड येथून चोरी केली असल्याची माहिती सांगीतली.