Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात हाणामारी, गुंडागर्दी सारख्या घटना घडतच आहेत. आता थेट आ. कर्डीले यांच्या गावात अर्थात बुऱ्हाणनगर मध्ये एका मद्यधुंद टोळक्याने धुडगूस घातल्याचे समोर आले आहे. येथे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झालाय.
बुऱ्हाणनगर येथील लहुजी चौकात एका कुटुंबावर रात्रीच्या सुमारास धारदार वस्तुने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत राजु नवगिरे (वय २२ रा. बाणेश्वर मंगल कार्यालयाच्या मागे, बुऱ्हाणनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

सुमित साळवे, आशिष साळवे (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. बाणेश्वर मंगल कार्यालयाच्या मागे, बुऱ्हाणनगर), अमित साठे, नितीन साठे (दोघे रा. रामवाडी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मंगळवारी (१८ मार्च) रात्री ९.३० च्या सुमारास लहुजी चौक, बुऱ्हाणनगर येथे ही घटना घडली. फिर्यादी त्यांच्या कुटुंबासह घरी असताना सुमित साळवे, आशिष साळवे, अमित साठे, नितीन साठे हे मद्यधुंद अवस्थेत फिर्यादीच्या घरासमोर शिवीगाळ करत होते.
फिर्यादी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता संशयित आरोपींनी आक्रमक होत फिर्यादीच्या आईच्या डोक्यात धारदार वस्तूने मारहाण केली. तसेच, फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला गंभीर दुखापत करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
अधिक तपास पोलीस अंमलदार मोरे करत आहेत. जिल्ह्यात अशा अनेक घटना घडत आहेत त्यामुळे पोलिसांनी अशा प्रवृत्ती वेळीच ठेसून काढाव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.