Ahilyanagar News : अजूनही लसूण बसलाय रुसून ! लसणाचे भाव दोनशे रुपयांच्या पुढे, आवक घटली, भाव आणखी वाढण्याची शक्यता

Ahmednagarlive24 office
Published:

Ahilyanagar News : हायब्रीड पिकांची लागवड करण्याची पद्धत विकसित झाल्याने गेल्या काही वर्षांत गावरान लसणाच्या लागवडीत घट झाली. शक्यतो घरगुती खाण्यापुरता गावरान लसूण लावला जातो. त्यामुळे इतर राज्यांतून लसूण आवक होतो. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून लसणाचे दर चांगलेच वाढले असून गृहिणींचे महिन्याचे अंदाजपत्रक बिघडले आहे.

नगरचा विचार केला तर गावरान लसूण २०० रुपये प्रतिकिलो अशा भावात विकला जातोय. किरकोळ बाजारात तीनशेपर्यंत हा लसूण विकला जात आहे. दरम्यान हे भाव आणखी वाढण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.

का गगनाला भिडले दर
यंदा विषम वातावरण राहिले. त्याचा परिणाम उत्पनावर झाला व लसूण पिकाचे मोठे नुकसान झाले. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हे प्रमुख कारण असून पिकाचे नुकसान झाल्यामुळे दुसऱ्या पिकाची पुनर्लागवड करून तो नवा लसूण आवक होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भाव वाढले असून नवीन लसूण बाजारात येताच भाव उतरतील असाही एक अंदाज व्यक्त होत आहे. नगर बाजार समितीत मंगळवारी ४० क्चिटल लसणाची आवक झाली. त्यास ५ हजार रुपयांपासून १२ हजार रुपये प्रतिक्चिटल इतका भाव मिळाला. सरासरी भाव ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल इतका होता. बाजारात मागील चार ते पाच महिन्यांपासून लसणाचे दर असेच वाढलेले असून नवीन लसूण बाजारात आला असला तरी कमी होताना दिसत नाहीत. दरम्यान, नगरमध्ये लसणाची आवक कमी आहे. किरकोळ बाजारात गावरान लसणाचे भाव २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत. नवीन लसूण बाजारात विक्रीस येईपर्यंत दर असेच राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कांद्याने रडवले, लसणाने हसवले
कांदा लागवडीतून चांगले अर्थार्जन होते यासाठी नगरचे शेतकरी लसूण लागवड कमी करत गेले व कांद्याची लागवड वाढत गेली. पण आज या कांद्यानेच शेतकरी रडवेला झाला आहे. कांद्याला भाव नसल्याने साधा खर्चही निघत नसल्याचे दिसते. याउलट ज्या शेतकऱ्यांकडे लसूण होता त्यांना मागील काही महिन्यापासून चांगले अर्थार्जन होताना दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe