अहिल्यानगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणारे आवश्यक २७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची १२ अशा एकूण ३९ पदांना मान्यता देण्यात आली. या पदासाठी आवश्यक वेतनासाठी दरवर्षी २३२.०१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.या खर्चासाठीही मान्यता देण्यात आली.

या पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यासही आज मंजुरी देण्यात आली. संस्थेकरिता आवश्यक यंत्रसामग्री, हत्यारे आणि इतर खर्च यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात अकरा कोटी ऐंशी लाख एकोणीस हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वसतीगृह योजनेस नाव
धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव देण्यास राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतीगृह उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
प्रत्येकी 200 विद्यार्थी क्षमतेची ही वसतीगृह असणार आहेत. यात मुलांसाठी 100 क्षमतेचे तर, मुलींसाठी 100 क्षमता आहे. नाशिक येथे काम सुरु, पुणे, नागपूर येथे लवकरच सुरु होणार आहे.