अहिल्यानगरमध्ये काय घडेल याचा आता काही नेम राहिलेला नाही. आता एका गावात एक कोटी रुपयांचा बेकायदेशीर दारू साथ जप्त करण्यात आलाय. गोव्यावरून कंटेनर भरून दारू आणण्यात आली होती. नगर तालुका पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्त पणे कारवाई करत नगर-दौंड रोडवर खडकी गावच्या शिवारात ही कारवाई केली. या कारवाईत ८४ लाखांचा विदेशी दारूचा साठा व २१ लाखांचा कंटेनर असा सुमारे १ कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी : नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना ३ एप्रिल रोजी सायंकाळी माहिती मिळाली की, गोवा राज्यात निर्मित दारूचा मोठा साठा घेवून एक कंटेनर बेकायदेशीरपणे नगर-दौंड रोडने नगर शहराकडे येत आहे. ही माहिती त्यांनी पोलिस अधिक्षक राकेश ओला, नगर ग्रामीणचे उपअधीक्षक संपतराव भोसले यांना कळविली. त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक
गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळविण्यात आले.

ही माहिती मिळताच स.पो.नि. गिते, दारूबंदी विभागाचे निरीक्षक घुगे, कुसळे, उपनिरीक्षक रुपेश चव्हाण, नवनाथ घोडके, रवींद्र जाधव, रवींद्र झोळ, गणेश पडवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे शाहीद शेख, अरुण गांगुर्डे, गणेश धोत्रे, सागर मिसाळ अशांच्या संयुक्त पथकाने नगर दौंड रोडवर खडकी शिवारात सापळा लावला.
काही वेळात संशयित कंटेनर येताना दिसला. समोर पोलिस पथक पाहून चालकाने कंटेनर थांबवून जवळील ऊसाच्या शेतात तो पसार झाला. पोलिसांनी कंटेनरची पाहणी केली असता त्यात ८४ लाखांची गोवा राज्यात निर्मित विदेशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून पुढील कारवाईसाठी दारूचा साठा असलेला कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.