Ahilyanagar News : मनपा प्रभाग रचनेवर खासदार नीलेश लंके यांची हरकत आरक्षणाचा उल्लेख टाळून केलेले प्राधिकृत प्रकाशन कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप

Published on -

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर खासदार नीलेश लंके यांनी तीव्र हरकत घेत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागांच्या भूसीमांबाबतचे प्राधिकृत प्रकाशन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नव्या प्रभाग रचनेत अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचा कोणताही तपशील दिलेला नाही. हे भारतीय संविधानाच्या कलम १६, २४३(टी), २४३(एस) तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५(अ) च्या तरतुदींना सरळ विरोध करणारे आहे.

खासदार लंके यांनी आरोप केला की प्रभागांची रचना गुगल मॅपवर वाकड्या-तिकड्या रेषा मारून, गोपनीयतेचा भंग करत व मतदारसंघांची ताटातूट करून करण्यात आली आहे. “राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीच हा डाव आखण्यात आला आहे,” असा त्यांचा दावा आहे.

२०१८ च्या मनपा निवडणुकीत तत्कालीन आयुक्तांनी प्रत्येक प्रभागाचे आरक्षण जाहीर करून नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. मात्र यावेळी त्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले असून, हरकती दाखल करण्याचा मूलभूत अधिकारही नागरिकांकडून हिरावून घेतल्याचा आरोप लंके यांनी केला.

नगर विकास विभागाच्या १० जून २०२५ च्या आदेशातील नैसर्गिक मर्यादा- मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रेल्वे रुळ यांचा विचार न करता ही रचना करण्यात आली आहे, असेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे २०१८ प्रमाणेच जुनी प्रभाग रचना कायम ठेवूनच आगामी महानगरपालिका निवडणूक घ्यावी, अशी ठाम मागणी खासदार लंके यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News