सध्या वातावरण अत्यंत चित्रविचित्र झाले आहे. विविध आजारही जोडायला लागले आहेत. परंतु आता शिर्डीत एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. येथे आता कुत्र्यांना डायबेटीसची लागण झाली आहे. त्यांच्या अंगावरील केस गळायला लागले आहेत.
बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किटे व दुधाचा आहार शिर्डीतील भटक्या कुत्र्यांना भोवला आहे. त्यांच्या अंगावरील केस गळू लागले असून, पोटात जंतू निर्मितीने ते आजारी पडू लागले आहेत. प्राणीप्रेमी व पशुवैद्यकीय विभागाच्या पाहणीत व तपासणीत या बाबी स्पष्ट होऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे शिर्डीतील बहुतांश भटकी कुत्री केवळ गोडच खातात. अन्य काहीही दिले तरी त्याला तोंडही लावत नाहीत. मात्र, सतत गोड खाण्याने त्यांच्यात सुस्ती वाढली आहे.

प्राणी प्रेमींनी यामुळे या कुत्र्यांवर उपचार कसे करता येतील, यादृष्टीने विचार व प्रयत्न सुरू केले आहेत. शिर्डीच्या साई समाधी मंदिर परिसरातील भटकी कुत्री निवांतपणे पहुडलेली असतात. भक्तांकडून मिळणारे बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किटे आणि दुधाचा आहार यामुळे या कुत्र्यांना मधुमेह झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक कुत्र्यांच्या अंगावरील केस गळाले असून, पोटात जंतू झाल्याने ते आजारी पडत आहेत.
सतत गोड पदार्थ सेवनाने त्यांच्यामध्ये लठ्ठपणाही आला आहे. भाविक अन्नदान करताना साईबाबांवरील श्रद्धेपोटी ते भटक्या कुत्र्यांच्या मुखी प्रसाद म्हणून गोड पदार्थ भरवतात. सततच्या गोडधोड खाण्याने मंदिराच्या दीड किलोमीटर परिसरातील भटकी कुत्री धष्टपुष्ट झाली आहेत. त्यांचे वजन वाढल्याने लठ्ठपणा आला आहे. सुस्तीमुळे प्रतिकार क्षमता क्षीण होत आहे. कायम गोडधोड खाण्याने दुसरा कोणताच पदार्थ चव देत नाही.
गोडाशिवाय अन्य दुसरा पदार्थ त्यांच्यासमोर टाकला तर ते त्याला तोंडही लावत नाहीत. किलोच्या पटीत गोड पदार्थ खाणारी भटकी कुत्री सुस्तावल्याने भाविकाने जवळ येत पाठीवरून हात फिरवला तरी ते काहीच करत नाहीत. मात्र, साई मंदिराच्या दोन किलोमीटर परिघाबाहेरील भटकी कुत्री मात्र तरतरीत असल्याचा विरोधाभास दिसतो. काही दिवसांपूर्वी पशुवैद्यकीय विभागाने काही कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर उपचार केले.
सेवाभावी संघटना पुढे आल्या तर मधुमेह, निद्रानाश झालेल्या श्वानांवर उपचार शक्य आहेत तसेच भाविकांनी या कुत्र्यांना गोडधोड खाऊ घालू नये, त्यादृष्टीने प्रबोधन आवश्यक असल्याचे पशुवैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे. कुत्र्यांचे आयुष्यमान दहा ते बारा वर्षे असते. त्यात त्यांना डायबेटीससारखा आजार झाला तर त्यांचे आयुष्यमान कमी होऊ शकते, गोड पदार्थ या आजारासाठी प्रमुख कारण ठरत आहे, असेही पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.