Ahilyanagar News : देवळाली प्रवरा येथील अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या तीन ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा मारुन 38 हजार 610 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला. यात तिघांना जेरबंद करण्यात आले.
गावठी हातभट्टीची दारू
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवरा येथे छुप्या पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू तयार करून तिची विक्री करत असल्याबाबत माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्याने त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी देवळाली प्रवारा येथे छापा टाकला.

गणेश रमेश गायकवाड याच्या घराजवळ गावठी दारु तयार करण्याचे काम सुरु असताना पोलिसांनी छापा मारला. दारु तयार करण्याचे रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू असा 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन गणेश गायकवाड यास ताब्यात घेतले. दुसऱ्या कारवाईत रवींद्र डुकरे (रा.टाकळीमिया रोड) याला ताब्यात घेत 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
दारुच्या बाटल्या जप्त
देवळाली प्रवरा बाजार तळावर छापा टाकत तेथेही ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामकिसन भागवत याला ताब्यात घेत १ हजार ६१० रुपये किमंतीची देशी व विदेशी भिंगरी संत्री नावाच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तीन वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात 38 हजार 610 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पो.हे.कॉ. बबन राठोड, पो.हे.कॉ. हनुमंत आव्हाड, पो.कॉ. गणेश लिपणे, पो.कॉ. शेषराव कुटे, पो.कॉ. अंबादास गीते, होमगार्ड शरद कोबरने, रवींद्र कदम आदींच्या पथकाने केली.