काल (दि.२६) अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी घटना घडली. राहुरी शहरातील बुवासिंध बाबा तालिममधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली होती. या घटनेनंतर राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. संतप्त शिवप्रेमींनी तालुका बंदची हाक दिली होती. तालुक्यात आज (दि.२७) कडकडीत बंद पाळण्यात आला.
देवळाली प्रवरा येथे यात्रा उत्सव असल्याने दुपार पर्यंत बंद पाळून समाजकंटकाचा जाहीर निषेध करण्यात आला. शिवप्रेमींनी या घटनेच्या निषेधार्थ काल केलेले रास्तारोको आंदोलन (दि.२६) मागे घेताना राहुरी तालुका बंदची घोषणा करण्यात आली होती. तालुक्यातून बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. राहुरी फॅक्टरी, टाकळिमियाँ, वांबोरी, सोनगाव देवळाली प्रवरा आदी भागात सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेऊन घटनेचा निषेध नोंदविला.

टाकळिमियाँ येथील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून फुलहार वाहिले. ग्रामस्थांच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी असंख्य नागरिक, शिवप्रेमी, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.