Ahilyanagar News : परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका रस्त्यावर ! अहिल्यानगरमधील ‘या’ ठिकाणी रस्त्यावर प्रश्नपत्रिकांचा ढीग, अखेर सत्य समोर..

Updated on -

अहिल्यानगर जिल्ह्यात परीक्षेत कॉपी करण्याचे अनेक प्रकार घडत असतानाच आता तर परीक्षेपूर्वीच चक्क रस्त्यावर प्रश्न पत्रिकांचा सडा पडला आहे. दौंड – जामखेड महामार्गावर विखुरलेल्या अस्वस्थेत पडल्या असल्याची घटना समोर आली आहे.

अनेकदा प्रश्नपत्रिका फुटण्याच्या विविध घटना सातत्याने होत असतात. अनेक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटलेल्या घटना याआधी घडलेल्या आहेत. परंतु आता अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. परीक्षेच्या आधीच सुमारे ५०८ प्रश्नपत्रिका रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत.

श्रीगोंदे शहरात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन २०२४- २५ वर्षासाठी मराठी माध्यमाच्या गणित विषयाच्या सुमारे ५०८ प्रश्नपत्रिका दौंड – जामखेड महामार्गावर विखुरलेल्या अस्वस्थेत आढळून आल्या. दि.२८ रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार समोर आला. सजग नागरिकांनी सर्व प्रश्नपत्रिका गोळा करून पोलीस ठाण्यात जमा केल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की विजय उंडे नेहमीप्रमाणे मित्रांसोबत पहाटे व्यायामाला चालले होते. छत्रपती महाविद्यालयासमोरील जामखेड – दौंड महामार्गावर त्यांना अर्धा किलोमीटर अंतरात या प्रश्नपत्रिका विखुरलेल्या अस्वस्थेत आढळून आल्या. सर्वांनी मिळून ५०८ प्रश्नपत्रिका गोळा केल्या व पोलिस ठाण्यात जमा केल्या. यावेळी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी पंचायत समिती शिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केल्या.

यावेळी शिक्षणाधिकारी मच्छिंद्र यांनी शिक्षण विभागाकडे अधिक चौकशी केली असता या प्रश्नपत्रिका बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पंचायत समिती शिक्षण विभागात जाणार होत्या व परीक्षेआधी तालुक्यातील शाळांमध्ये वितरित केल्या जाणार होत्या अशी माहिती समजली. दरम्यान, या प्रकरणाने खळबळ उडाली असून आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे.

शिरीष कार्गो मालवाहतूक कंपनीकडे वितरणाचा ठेका

पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता चौथीसाठी मराठी माध्यमाच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका होत्या. राज्य शिक्षण विभागाने शिरीष कार्गो या मालवाहतूक कंपनीकडे वितरणाचा ठेका दिला होता. या कंपनीने निष्काळजीपणा दाखवल्याने प्रश्नपत्रिका रस्त्यावर पडल्या असल्याचे बोलले जात होते.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe