Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका मस्जिदजवळ ही घटना घडली. मस्जिदमध्ये चेष्टा मस्करी करु नका असे म्हटल्याचा राग येऊन सहा जणांच्या टोळक्याने तरुणास शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी व धारदार वस्तूने डोक्यात मारहाण केली. ही घटना मुकुंदनगर येथील गौसिया मस्जिदजवळ घडली.
या बाबत नाजीम मोहंमदअली शेख (वय ३२, रा. मुकुंदनगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नाजीम शेख हे गौसिया मस्जिद येथे नमाज पठण करण्यासाठी गेले असता मस्जिद मध्ये आदिल शेख ऊर्फ मुन्ना, अदनान अदिल शेख, अफनान शेख, हसनान आदिल शाह, नाझीश साजिद शेख, साजिद शेख (सर्व रा. मुकुंदनगर) एकत्र जमवून चेष्टा मस्करी करत होते.

त्यावेळी नाजीम त्यांना म्हणाला की येथे चेष्टा मस्करी करू नका ही मस्जिद आहे. असे म्हणून तो नमाज पठण करण्याकरिता गेला. नमाज पठण करून मस्जिद च्या बाहेर आला असता बाहेर थांबलेल्या आदिल शेख उर्फ मुन्ना व इतरांनी शिवीगाळ करीत नाजीम याचे डोक्यात काहीतरी धारदार हत्याराने मारहाण करुन दुखापत केली.
इतरांनी नाजीम यास लाथा बुक्क्यांनी व लोखंडी पाइपने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली. या मारहाणीत नाजीम हा गंभीर जखमी झाला. त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन कोठेतरी गहाळ झाली. त्या ठिकाणी लोक जमा होऊ लागल्याने मारहाण करणाऱ्यांनी
नाजीम यास ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले. नागरिकांनी नाजीम यास शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मारेकरी टोळक्याने नाजीम याचे घरी जाऊन त्याचे डायपर दुकानात लोखंडी पाइपने तोडफोड केली व मोटारसायकलची तोडफोड करून नुकसान केले. यावेळी दुकानातील साहित्याचे नुकसान झाले आहे असे नाजीम शेख याने फिर्यादीत म्हंटले आहे.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी नाजीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अदिल शेख उर्फ मुन्ना, अदनान शेख, अफनान शेख, हसनान शाह, नाझीश साजिद शेख, साजिद शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.