बारावीत शिकणारा वारकरी वृत्तीचा निष्पाप मुलगा. पेपर सुरु असतानाच मिसिंग झाला. नंतर कुटुंबियांना तो सापडला तो थेट तुकडे तुकडे झालेला मृतदेहच. मृतदेहाची भयंकर विटंबना, एका विहिरीत त्यांचे तुकडे तुकडे केलेले अवयव तर दुसऱ्या विहिरीत त्याचे धड. धक्कादायक म्हणजे मृतदेह व त्याचे हात, पाय हे आरोपींनी अत्याधुनिक कटरने कापले आहेत.
हे सगळं सहन केलं श्रीगोंदेतील माउली गव्हाणे या १९ वर्षाच्या बारावीतील युवकाने. विशेष म्हणजे माउलीने असल्या दिवशी छत्रपती संभाजीराजेंचा ‘छावा’ सिनेमा पाहिला होता.

सिनेमा पाहिल्यानंतर राजेंची कशी निर्घृण हत्या झाली हे त्याने त्यांच्या कुटुंबियांना डोळ्यात पाणी आणून सांगितले होते. आणि त्याची अगदी तशीच सर्व अवयव कापून दुसऱ्या दिवशी हत्या झाली. ही माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. मृतदेह इतक्या छिन्नविछिन्न होता की ओळखणेही मुश्किल. परंतु त्यांच्या आईने त्यांच्या कानातील बाळीवरून ओळखले आन ओळख पटली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मृतदेह पाहून गव्हाणे कुटुंबाचा झालेला आक्रोश पाहून उपस्थितांच्याही काळजाचा ठेका चुकला. विहिरीमध्ये धड पडलेले आणि दुसऱ्या विहिरीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एक गाठोडे की ज्यात त्याचे कापलेले अवयव होते.
माऊली ७ मार्चला शिरूर येथे बारावीच्या पेपरसाठी गेल्यानंतर मिसिंग झाला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता. खून करणाऱ्यांनी मृतदेह व त्याचे हात, पाय हे अत्याधुनिक कटरने कापले आहेत. माऊलीची एवढ्या निर्घणपणे हत्या कोणी केली ? याचा तपास पोलीस करत आहेत.
या खुनातील आरोपींचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व मृत माऊली गव्हाणे यांच्या कुटुंबाने केली आहे, अन्यथा नगर-पुणे हायवे वरती रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे