Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील तलाठी जाळ्यात ! पतीच्या निधनानंतर वारस लावण्यासाठी महिलेकडे केली ‘ही’ मागणी

Published on -

अहिल्यानगरमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या वाढत चालली कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे मागील काही दिवसांत लाचलुचपतने अहिल्यानगरमध्ये अनेक कारवाया केल्या आहेत. या कारवाई होऊनही अद्याप लाच घेण्याचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. आता अहिल्यानगरमधील एक तलाठी रंगेहात लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलाय.

पतीच्या निधनानंतर शेत जमिनीला पत्नीची वारस नोंद लावण्यासाठी ३ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तब्येत घेतले. पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथे २४ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. आशीर्वाद प्रभाकर घोरपडे (वय ३४, तलाठी पाडळी आळे, ता. पारनेर, रा. घर नं.१५५, पाईपलाईन हडको, एकविरा चौक, सावेडी, अहिल्यानगर) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी: यातील तक्रारदार हे पाडळी आळे, ता. पारनेर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांच्या आत्या ह्या शेजारच्या कळस ता. पारनेर या गावच्या मूळ रहिवासी असून त्या अशिक्षित आहेत. कळस येथे तक्रारदार यांच्या आत्याचे पती यांचे नावे शेतजमिन आहे. त्यांचे पती हे ६ ऑगस्ट २०२३ रोजी मयत झाले होते. तक्रारदार यांचे आत्याच्या पतीच्या नावे असलेल्या शेत जमिनीला वारसदार आहेत. सदर शेत जमिनीला वारस नोंद लावण्यासाठी पाडळी आळीचे तलाठी यांच्याकडे सर्व संबंधित कागदपत्रे एक महिन्यापूर्वी जमा केली होती.

तक्रारदार यांच्या आत्या ह्या अशिक्षित तसेच वयोवृद्ध असल्याने व तक्रारदार यांचा आते भाऊ हा पनवेल, नवी मुंबई येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या कळस येथील शेत जमिनी बाबतच्या वारस नोंदीच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांच्या आत्या यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले आहे.

सदर वारस नोंद लावण्याकरिता तलाठी घोरपडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार २४ मार्च रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तलाठी आशीर्वाद घोरपडे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे ३ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पाडळी आळे, तलाठी कार्यालय येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी घोरपडे यांनी तक्रारदार यांचे कडून ३ हजार रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe