जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शासकीय धान्यगोदाम, तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या शासकीय इमारती पाडून तसेच या इमारतीवरील पत्रे, सागवानी दरवाजे, खिडक्या व सागवानी लाकडे व शासकीय मालमत्तेचा अपहार करुन अंदाजे २० लाख रुपयाचे नुकसान करण्यात आले. तसेच येथील गाळेधारकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दहशत निर्माण करुन, जीवे मारण्याची धमकी देत गाळे जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप करत चार जणांवर खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अधिक माहिती अशी : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बसस्थानकासोर असलेल्या जुना सर्व्हे नंबर २८६ नवीन सर्व्हे नंबर १३७ व गट नंबर ३६० मधील शासकीय धान्यगोदाम, तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या शासनाची मालमत्ता असल्याचे माहित असतानाही बंद गोडाऊनचे कुलूप तोडण्यात आले. या इमारतीवरील पत्रे, सागवानी दरवाजे, खिडक्या व सागवानी लाकडे काढून नेले आहेत. तसेच शासकीय मालमत्तेचा अपहार करुन नमूद सर्व शासकीय इमारती पडून अंदाजे २० लाख रुपयाचे नुकसान करण्यात आले आहे. या ठिकाणचे गाळेधारक उमेश मोतीलाल गुरसाळी, रघुनाथ शंकर खेडकर व रेवण गणपत कोठावळे यांना शिवीगाळ करुन, दहशत निर्माण करुन, जीवे मारण्याची धमकी देत त्यांचे गाळे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यानुसार तहसील कार्यालयाचे अतिरिक्त पुरवठा निरीक्षक तथा मंडळ अधिकारी विजय बापुराव चव्हाण (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड हे करत आहेत.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
या गंभीर घटनेकडे तालुक्यातील कोणत्याही शासकीय यंत्रणेने लक्ष दिले नाही. मात्र गावातील जागृत नागरिक उमेश गुरसाळी, शिवाजी भोसले, संभाजी भोसले, उमेश कोठावळे, अनिल राऊत, दत्तात्रय भोसले, खेडकर, उमेश गुरसाळी यांनी आवाज उठवत ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानुसार या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येतील असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शिष्टमंडळाला दिले.