Ahilyanagar News : नगरच्या पोलिसाचा मोठा प्रताप, सगळं खोटं दाखवत न्यायालयही फसवलं..धक्कादायक प्रकरण समोर

अहिल्यानगरमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पोलिसानेच सर्वकाही बनावट करून थेट न्यायालयाचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची मालमत्ता गिळंकृत करण्यासाठी एका पोलिसाने बनावट दस्त तयार करून तो नगरच्या दिवाणी न्यायालयात सादर करून न्यायालयाचीच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा

न्यायालयाच्या आदेशानुसार या पोलिसासह तिघांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात ३ एप्रिलला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्रुबा यादव नरोटे (निवृत्त सहाय्यक लेखाधिकारी, जिल्हा परिषद, नगर, रा. लक्ष्मीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिस दलात कार्यरत नरेश विष्णूपंत कोडम (वय ४६) त्यांची पत्नी जयश्री नरेश कोडम (वय ४२, दोघे रा. तपोवन रोड) व रुपेश प्रकाश कोडम (वय ४१, कालवा निरीक्षक, मुळा कालवा उपविभाग, दिंडोरी, नाशिक) या तिघांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी नरोटे यांची लक्ष्मीनगर येथे ३ गुंठे जागा असून त्यांनी ती एका बांधकाम व्यावसायिकाला विकसित करण्यासाठी दिली होती. मात्र काही कारणाने त्यांचा करार त्यांनी सहमतीने रद्द केला होता. सदर मिळकत गिळंकृत करण्यासाठी नरेश कोडम याने बनावट दस्त तयार केला.

त्यावर साक्षीदार म्हणून त्याची पत्नी जयश्री कोडम आणि रुपेश कोडम असल्याचे दाखवून सदर खोट्या कागद पत्रांच्या आधारे नगरच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.  त्यास फिर्यादी नरोटे यांनी हरकत घेतली. हा दावा न्यायालयात सुरु असताना फिर्यादी नरोटे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये विविध प्रकारची माहिती मिळवली.

सदरचा दस्त हा शिर्डी येथे नोंदविण्यात आल्याचे भासविण्यात आले होते. त्याची नोंदणी २७ मे २०१९ झाली असल्याचे आणि त्यादिवशी साक्षीदार रूपेश कोडम तेथे उपस्थित असल्याचे ‘भासविण्यात आले होते.

त्यामुळे फिर्यादी नरोटे यांनी मुळा कालवा सर्वेक्षण उपविभाग पांडाणे, दिंडोरी या कार्यालयात २७ मे २०१९ रोजी रुपेश कोडम कार्यालयात उपस्थित होता का याची माहिती मागविली. त्या कार्यालयाने कोडम हे कार्यालयात उपस्थित असल्याची माहिती दिली. या माहिती सह नोंदविण्यात आलेला दस्त कसा बनावट आहे. याचे पुरावे फिर्यादी नरोटे यांनी दिवाणी न्यायालयात सादर केले.

तसेच न्यायालयाची फसवणूक करत आपली मालमत्ता कपटनितीने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून दिले. फिर्यादी नरोटे यांचे साक्षी पुरावे ग्राह्य धरून अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सदर ३ आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश भिंगार कॅम्प पोलिसांना दिले आहेत.