Ahilyanagar News : श्रीराम नवमी निमित्त ६ एप्रिल रोजी सकल हिंदू समाजासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान यासाठी नगर शहरातील अनेक रस्ते, अनेक भाग ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
श्रीराम नवमी निमित्त काढण्यात येणारी मिरवणूक अहिल्यानगर शहरातील महत्वाच्या भागातून व बाजारपेठेतून जाणार आहे. सदर मार्गांवर अनेक भागांमध्ये स्टेज टाकून व ध्वनिक्षेपक लावून श्रीराम जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरु असते.

सार्वजनिक वाहतुकीमुळे धोका
या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सामील होणार आहेत. त्यादृष्टीने मिरवणुकीत सामील होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेस सार्वजनिक वाहतुकीमुळे धोका पोहोचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मिरवणुकीचा मार्ग नो व्हेईकल झोन (वाहन विरहीत क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
असा असेल नो व्हेईकल झोन
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इम्पेरिअल चौक, माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, बॉम्बे बेकारी चौक, चाँद सुलताना हायस्कूल, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापडबाजर तेलीखूंट, नेता सुभाष चौक-चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट या मार्गावर ‘नो व्हेईकल झोन’ असणार आहे. दिनांक ६ एप्रिल २०२५ ला दुपारी २ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत ‘नो व्हेईकल झोन’ असणार आहे.
फक्त ह्या वाहनांना एंट्री
दरम्यान, शासकीय वाहने, मिरवणुकीतील वाहने, ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांसाठी मात्र हा नियम लागू असणार नाही.
या मिरवणुकी दरम्यान अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मिरवणुकीचे ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.