Ahilyanagar News : ‘ते’ दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद, मोठा मुद्देमालही हस्तगत

Published on -

जामखेड तालुक्यातील बसरवाडी येथील वृद्ध दांपत्यावर दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. मुन्ना उर्फ सतीष लायसन भोसले (वय २१) व किशोर उर्फ बुट्या हापुस भोसले (वय २०) (दोघेही रा. कासारी, ता. आष्टी, जिल्हा बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी : दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी जामखेड तालुक्यातील बसरवाडी शिऊर येथे ७० वर्षीय काशीबाई सुर्वे व त्यांचे पती यांच्यावर तीन अनोळखी इसमांनी दरोडा टाकला होता. मारहाण करून त्यांचेकडील सोन्याचे दागीने जबरीन चोरून नेले. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासकामी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी विशेष पथक नेमले होते.

या पथकाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांच्या माहितीच्या आधारे दि २३ मार्च रोजी २०२५ रोजी जामखेड येथील नवले पेट्रोलपंपावरून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून अटक केली. मुन्ना उर्फ सतीष लायसन भोसले (वय २१) व किशोर उर्फ बुट्या हापुस भोसले (वय २०) (दोघेही रा. कासारी, ता. आष्टी, जिल्हा बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपींची पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत मुन्ना भोसलेकडून ७ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ५६,००० रुपये) जप्त करण्यात आले. फरार साथीदार मोहन निकाळजे भोसले यासह त्यांनी एक महिन्यापूर्वी वृद्धांच्या घरावर हल्ला केला होता. ताब्यातील आरोपींना जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध सुरू आहे. सदर घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe