नाशिकहून पुण्याकडे प्लायवूड घेऊन भरधाव वेगाने जाणारा मालट्रक संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात पलटी झाला. या ट्रकखाली दुचाकीवरून जाणार कुटुंब दबले गेले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले. पुणे-नाशिक बाह्यवळण राष्ट्रीय मार्गावर गुंजाळवाडी शिवारात पुलाच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे.
त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक सर्व्हिस रस्त्याने वळवलेली आहे. नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर गतिरोधक नाही. त्यामुळे भरधाव वेगाने वाहने अपघाताला निमंत्रण देतात. नाशिकहून फ्लायवूड भरलेला मालट्रक (क्र. एमएच १२, एनएक्स ३४८०) हा गुंजाळवाडी शिवारात आला. मालट्रकला हेलकावा बसल्याने तो खड्यात जाऊन पलटी झाला.

त्याच वेळी मालदाड येथील नातेवाईकांकडून पोखरी बाळेश्वरला घरी दुचाकीवर (क्र. एमएच १७, के ४२४९) जात असताना पलटलेल्या ट्रकखाली सरिता गोपीनाथ फटांगरे (वय ४५) या सापडून जागीच ठार झाल्या.
गोपीनाथ फटांगरे (वय ५०) आणि रवी गोपीनाथ फटांगरे (वय २४) हे दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच डोळसने महामार्ग मदत केंद्राच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
संगमनेर शहर पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनीही घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, या अपघातास मालट्रकच कारणीभूत असल्यामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांना मदत द्यावी, या मागणीसाठी मृत महिलेचे नातेवाईक आक्रमक झाले.
मदत मिळत नाही, तोपर्यंत मालट्रकमधील माल दुसऱ्या वाहनात भरू देणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. संबंधित मालकाने मृत महिलेच्या भावाच्या अकाउंटवर मदत पाठविल्यानंतर वातावरण शांत झाले.